कलंदर: चलनी नोटा…

उत्तम पिंगळे

परवाच प्राध्यापक विसरभोळे यांचेकडे गेलो होतो. मला पेपरमधली बातमी दाखवत म्हणाले की टायरमधून दोन कोटी जप्त केले.

मी: सर, पण निवडणुकीत उमेदवार पैसा टाकत असतातच.
विसरभोळे: मला माहीत नाही वाटतं? पण दोन हजाराच्या नोटा टायरमध्ये बेमालूमपणे टाकलेल्या आहेत. या नोटा अजून चालू कशा आहेत?
मी: मी समजलो नाही. हे जरा नीट सांगा पाहू.
विसरभोळे: जरा नीट आठवा नोटबंदीची कारणे काय होती. काळा पैसा बाहेर काढणे, भ्रष्टाचारास आळा घालणे, अतिरेक्‍यांच्या कारवाईस चाप बसणे.
मी: बरोबर आहे, मग काय झाले?
विसरभोळे: काही झाले काय? मुळात 99 टक्‍केहून अधिक पैसा बॅंकांत परत आला. म्हणजे देशात काळा पैसा नव्हता का? हाच खरा प्रश्‍न आहे. आता दुसरीकडे म्हणतात की, नोटबंदीने बरेच छोटे मोठे उद्योग व पर्यायाने रोजगार थंडावला. आता हे नोटबंदीचे कारण असू शकत नाही. कारण तुमचे व्यवहार चोख असतील तर रोख काय किंवा डिजिटल काय काहीच फरक पडणार नाही. म्हणजेच काही तरी गफलत आहे किंवा काळा पैसा सुखरूप बॅंकेत पोहोचला आहे. आता दुसरा मुद्दा दोन हजार रुपयांच्या नोटेचा. 500 व 1000 जुन्या नोटा चलनात सुमारे 87 टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचल्या होत्या. नोटा अचानक रद्द केल्याने दुसरे चलन व्यवहारात आणणे कठीण होते. मग दोन हजाराच्या नोटा छापल्याने ते काम लवकर झाले. पण 500 व 1000 च्या नोटा रद्द केल्या त्या काळा पैसा बाहेर काढण्यासाठी मग दोन हजार रुपयांची तात्पुरती तरतूद ठीक होती; पण आता निवडणुकीत ही नोट सहज फिरताना दिसत आहेत.

मी: म्हणजे तुमचे म्हणणे दोन हजाराच्या नोटा चलनात असूच नयेत?
विसरभोळे: एकदम बरोबर, नवीन 1000 च्या नोटा काढायच्या का नाही ते आरबीआय ठरवेल. मी काय म्हणतो की पाचशे पाचशेपेक्षा जास्तची नोट बाजारात नसावी तसेच या दोन हजाराच्या नोटा ताबडतोब रद्द केल्या पाहिजेत. डिजिटल व्यवहारास प्राध्यान्य दिले गेले पाहिजे. तसेच समान चलनाच्या वेगवेगळ्या नोटा करण्याची काहीच आवश्‍यकता नाही. परवाच एका आजींकडून 40 रुपयांचे अर्धा किलो चिक्‍कू घेतले. मी 100 रुपयांची नवी निळी नोट दिली. त्या बाईने मला जुनी शंभर रुपयाची नोट देऊन आणखी साठ रुपये देऊ केले. त्यावर मी म्हणालो की मी फक्‍त शंभर रुपये दिलेले आहेत. ती नोट नवीन शंभर रुपयांची आहे. त्या आजीला वाटले की ही नवीन नोट म्हणजे दोनशे रुपयांची आहे. कारण दोनच दिवसांपूर्वी कुणीतरी तिला दोनशे रुपयांची नोट दिली होती. त्यावर बाजूचा दुकानदारही म्हणाला की, दोन दिवसांपूर्वी या आजीने मला नोट दाखवली होती मग मी तिला सांगितले की ती दोनशेची आहे. आता ही वेगळीच नोट पाहून तिला पुन्हा वाटले की ती दोनशेची असावी म्हणून असे झाले. रोखीने छोटे छोटे व्यवहार करणाऱ्यांची या नवीन नोटांमुळे फसगत होत आहे. जे झालं ते ठीक पण यापुढे दोन हजाराची नोट हद्दपार केली पाहिजे. तसे 10, 20, 50, 100, 200 व 500 च्या नोटा एकाच छपाईच्या पण आकाराने मोठ्या होणाऱ्या असाव्यात. आज नव्या पाचशे रुपयांच्या नोटेपेक्षा जुनी शंभर रुपयाची नोट मोठी आहे. ग्रामीण जनतेची यामुळे फसगत होत आहे. रिझर्व बॅंकेने यात हस्तक्षेप करून एका चलनाची एकच प्रकारची नोट बाजारात आणण्याचे प्रयत्न करावे.

मी: आपले म्हणणे बरोबर आहे सर, यात नक्‍कीच सुधारणा होऊ शकते.
विसरभोळे: तेच म्हणतो मी, तसेच रिझर्व्ह बॅंकेनेही सर्व लोकांना याबाबत साक्षर करावे व डिजिटल व्यवहारांसही प्राधान्यता द्यावी. गॅस बुकिंगसाठी जशी डिजिटल पेमेंटला सवलत दिली जाते तशी सर्व क्षेत्रातील व्यवहारांना दिली गेली पाहिजे. त्यामुळे डिजिटल व्यवहार वाढीस लागून त्यात पारदर्शकताही येईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.