दखल: कुतूहल करोनाविषयीचे!

डॉ. मंदार परांजपे

सध्या समोर आलेले स्वास्थ्य-संकट म्हणजे चीनमधील “करोना’ विषाणूचा संसर्ग. चीनच्या हुबै प्रांतातील वुहान शहरात हा विषाणू पहिल्यांदा आढळला आणि अल्पावधीत हजारो लोकांना त्याची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले. जाणून घेऊया करोनाविषयी…

रोगाला बळी पडलेल्या रुग्णांची संख्या साडेचारशेपर्यंत पोहोचली. दहा-बारा देशांत हा विषाणू पोहोचला. अजूनही या संकटाची संपूर्ण माहिती शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय तज्ज्ञांनाही झालेली नाही. पण जी काही माहिती उपलब्ध झाली आहे, ती देण्याचा प्रयत्न या लेखाद्वारे करण्यात आला आहे. करोना हा विषाणूंचा एक गट आहे. करोना म्हणजे क्राउन किंवा मुगूट. या गटातील विषाणूंचा आकार हा एखाद्या मुगुटासारखा असतो; म्हणून या विषाणू-गटाचे नाव करोना. करोना गटाचे विषाणू प्राण्यांच्या श्‍वसनमार्गावर अतिक्रमण करतात. जोपर्यंत हे अतिक्रमण श्‍वसनमार्गाच्या वरच्या भागापुरते (म्हणजे नाक, घसा किंवा फारतर श्‍वसननलिकेचा अगदी सुरुवातीच्या भागापर्यंत) मर्यादित असते तोपर्यंत रुग्णाला नेहमीच्या फ्लूसारखा ताप, सर्दी, खोकला, घसादुखी असा सौम्य त्रास होऊन रुग्ण लवकरच बरा होतो. पण जेव्हा हे अतिक्रमण श्‍वसननलिकेच्या खालच्या भागापर्यंत आणि आणखी खोलवर म्हणजे फुफ्फुसापर्यंत जाऊन पोहोचते, तेव्हा ब्रॉंकायटीस आणि न्यूमोनियासारखे रोग उद्‌भवतात. काहीवेळा रुग्णाची परिस्थिती गंभीर होते आणि कृत्रिम श्‍वसनयंत्र (व्हेंटिलेटर) वापरण्याची वेळ येते. रुग्णाची प्रतिकारशक्‍ती कमी असेल किंवा विषाणूची आक्रमकता अधिक असेल, तर रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.

सध्या चीनमध्ये आढळलेल्या विषाणूचे संपूर्ण नाव “2019-एन.को.व्ही. (नॉव्हेल करोना व्हायरस)’ असे आहे. हा विषाणू अजून नवीनच असल्यामुळे लोकांमध्ये त्याच्याविरोधी नेमकी प्रतिकारक्षमता (व्हायरस-स्पेसिफिक इम्युनिटी) निर्माण झालेली नाही. त्याच्या प्रतिबंधासाठी लसही उपलब्ध झालेली नाही. तसेच या विषाणूवर रामबाण उपाय करणारी खात्रीलायक औषधेही विकसित झालेली नाहीत. (सध्या लोपिनाव्हिर आणि रिटोनाव्हिर अशा दोन औषधांचा प्रयोग करण्यात येत आहे. पण या औषधांची करोनाबाबतची उपयुक्‍तता अजून सिद्ध झालेली नाही.) अर्थात हा पाहुणा नवोदित आहे, तो फक्‍त माणसांसाठी. जंगली पशूंमध्ये त्याचे अस्तित्व पूर्वपासूनच असावे आणि त्यांच्या मांसाच्या बेकायदा विक्रीतून या विषाणूचा प्रसार झाला असावा असा एक अंदाज आहे. एका प्राण्यातून दुसऱ्या प्राण्यात प्रवेश करताना या विषाणूत अचानक काही जनुकीय बदल होतात. उदा. मानवी पेशींवरील “रिसेप्टार’ नावाची सूक्ष्म प्रवेशद्वारे उघडण्याची रेणूरूपी किल्ली या विषाणूंमध्ये तयार होते आणि मग हे घुसखोर मानवी पेशींवर हल्ला करतात आणि डल्ला मारतात. प्रारंभी विषाणू संसर्ग हा “जंगली पशू ते मानव’ असा होत असतो. पण एकदा जनुकीय बदलांमुळे हा विषाणू “मानव ते मानव’ असा संसर्ग करू लागला की, मानवजातीवर साथीच्या रोगाचे संकट ओढवते. तीच अवस्था “2019- एन.को.व्ही.’ने गाठली आहे.

या आधी 2002 साली वटवाघुळ आणि मांजरांमधून “सार्स’ आणि 2012 साली उंटांमधून “मेर्स’ या करोना विषाणूंचा संसर्ग उद्‌भवला होता. तसे करोना गटात सुमारे दोनशे प्रकारचे वेगवेगळे विषाणू आहेत; पण माणसात संसर्ग करू शकतील असे फक्‍त सहाच करोना विषाणू यापूर्वी सापडले होते. चीनमध्ये सापडलेला नॉव्हेल करोना विषाणू हा करोना घराण्याचा माणसात संसर्ग करू शकणारा सातवा सदस्य आहे. हा विषाणू रुग्णांची थुंकी, खोकला, शिंक यामधून श्‍वसनमार्गाद्वारे दुसऱ्या व्यक्‍तीच्या शरीरात शिरतो. या रोगाचे निदान करण्यासाठी श्‍वसनमार्गातील द्रवपदार्थवर पी.सी.आर. नावाची तपासणी करावी लागते. संसर्ग झाल्यानंतर काही दिवस रुग्णाला रोगाची कोणतीच लक्षणे जाणवत नाहीत. याला रोगाची “सुप्तावस्था’ (इंक्‍युबेशन पिरीएड) म्हणतात. नॉव्हेल करोनाबाबत ही सुप्तावस्था 14 दिवसांपर्यंत लांबू शकते. पण या सुप्तावस्थेत स्वतःला काहीच त्रास जाणवत नसला, तरी करोनाचा अनभिज्ञ रुग्ण हा तिसऱ्या माणसांपर्यंत नकळत विषाणूचा प्रसार करत राहू शकतो. म्हणजे विषाणू देणाराही गाफील आणि घेणाराही गाफील अशी स्थिती असते!

प्रशासनाला गाफील राहून चालत नाही. साथीला आळा घालण्यासाठी चीनच्या सरकारने वुहान शहरामधून लोकांच्या बाहेर जाण्यावर कडक बंधने घातली आहेत. अनेक देशांनी चीनमधून येणाऱ्या प्रवाशांना देखरेखीखाली (क्‍वारंटाइनमध्ये) ठेवायला सुरुवात केली आहे. संशयित करोनाचा रुग्ण आढळल्यास त्याला इतर रुग्णांपासून अलग सुविधेत (आयसोलेशनमध्ये) ठेवण्यात येत आहे. भारतातही ही दक्षता घेतली जात आहे. सुप्तावस्थेच्या दुप्पट कालावधीपर्यंत म्हणजे 28 दिवसांपर्यंत चीनमधून आलेल्या लोकांची पाहणी चालू ठेवली जात आहे. संशयित करोना रुग्णांच्या श्‍वसनमार्गातील द्रवपदार्थांचे नमुने पुणे स्थित राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत (एन.आय.व्ही. येथे) तपासणीसाठी पाठवले जात आहेत.

केवळ प्रशासकीय प्रयत्न पुरेसे ठरणार नाहीत. सर्व नागरिकांनीही दक्ष राहायला पाहिजे. रस्ते, इमारतीचे जिने, अंगण यांचा वापर थुंकणे, नाक शिंकरणे, ओल्या खोकल्याचा बडका टाकणे अशा विसर्जनांसाठी करणे बंद केले पाहिजे. त्यासाठी गटार, सिंक, प्रसाधनगृहे यांचाच वापर केला पाहिजे. उठसूट अकारण नाक किंवा डोळे चोळण्याची सवय सोडली पाहिजे. पाश्‍चात्य हस्तांदोलनाऐवजी भारतीय नमस्तेचा रिवाज अंगिकारायला पाहिजे. बाहेरून घरी आल्यावर किमान 15 ते 20 सेकंद साबणाचा फेस नीट चोळून हात स्वच्छ धुतले पाहिजेत. स्वतःला सर्दी, खोकला, ताप असताना गर्दीत जाणे शक्‍यतो टाळले पाहिजे. अन्न, वस्त्र, ताजे अन्न आणि विशेषतः मांसाहारी पदार्थ असल्यास तो संपूर्णपणे शिजला/भाजला गेला आहे ना याची खात्री खाण्यापूर्वी करून घेतली पाहिजे. राडारोडा, कचरा कुठेही न टाकता त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली पाहिजे. करोनापेक्षा कितीतरी अधिक मृत्यू दरवर्षी भारतात क्षयरोगामुळे (टी.बी.) होत असतात. “स्वच्छ भारत’चे तत्त्व आपण वैयक्‍तिक आणि सार्वजनिक असे दोन्हीबाबतीत पाळले, तर अशा अनेक रोगांना आळा बसेल.

श्‍वसनावाटे पसरणाऱ्या साथीच्या रोगाची चर्चा सुरू झाली की, अनेक लोक मास्क वापरू लागतात. नाका-तोंडावर लावण्याच्या मास्कबद्दल हे लक्षात घेतले पाहिजे की, फक्‍त “एन 95′ या श्रेणीच्या मास्कचाच विषाणू संसर्ग रोखण्यासाठी उपयोग होतो, तोही फक्‍त सहा तासापर्यंत आणि या सहा तासांत मास्क काढला नाहीत, तरच! सहा तासांनंतर हा मास्क परिणामकारक राहात नाही. तो टाकावा लागतो. म्हणजेच हा मास्क डिस्पोजेबल पद्धतीने वापरावा लागतो. रुग्णाच्या निकट संपर्कात येणारे आरोग्य कर्मचारी, डॉक्‍टर्स, नर्सेस यांनाच मास्क, गोल्ज, गॉगल्स असा संरक्षक साधनांची गरज असते. वेगवेगळे मानवी गट अनेकदा एकमेकांना स्वतःचे कट्टर शत्रू समजतात. पण करोनाच्या निमित्ताने घातक रोगजंतू, जागतिक तपमान वाढ, प्रदूषण, अमली पदार्थ (ड्रग्ज) हेच आपल्या सर्वांचे खरे शत्रू आहेत आणि त्यांच्याशी मुकाबला करण्यासाठी माणसामाणसांमध्ये दुश्‍मनीऐवजी सहकार्य आवश्‍यक आहे ही जाणीव जर आपल्याला झाली; तर करोनाची आपत्ती ही एक इष्टापत्ती ठरू शकेल!

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.