दहावी, बारावी परीक्षांच्या निर्णयाबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

पुणे  -इयत्ता दहावी, बारावीची परीक्षा नियमित वेळापत्रकानुसार होणार की लांबणीवर पडणार याबाबत शासनाच्या निर्णयाबाबत पालक, विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्य मंडळातर्फे दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे आणि दहावीची 29 एप्रिल ते 20 मेदरम्यान होणार आहे. मात्र, राज्यात पुन्हा मिनी लॉकडाऊन जाहीर झाल्याने या परीक्षांचे काय होणार, असा संभ्रम निर्माण झाला आहे.

या पार्श्‍वभूमीवर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ऑनलाइनद्वारे मंगळवारी बैठक घेतली. त्यात विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी, राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक दत्तात्रय जगताप, विद्या प्राधिकरणाचे संचालक दिनकर टेमकर आदींनी सहभाग घेतला. बैठकीत चर्चा झाली मात्र अंतिम निर्णय झाला नाही.

राज्य मंडळाकडून परीक्षा तयारीची माहिती बैठकीत देण्यात आली. ऑफलाइनद्वारे व ठरलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा घेणेच सोयीचे ठरणार आहे. करोनामुळे काही विद्यार्थ्यांना परीक्षा देता न आल्यास संबंधितांना पुन्हा संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला असल्यामुळे परीक्षा लांबणीवर टाकल्यास पुढील सर्व नियोजन कोलमडण्याची शक्‍यता आहे. याबाबी अधिकाऱ्यांकडून बैठकीत मांडण्यात आल्या. ऑनलाइन परीक्षा आता कोणत्याही परिस्थितीत घेणे शक्‍य होणार नसल्याचेही स्पष्ट केले.

नववी, अकरावीबाबत आज निर्णय
इयत्ता पहिली व आठवीच्या परीक्षा न घेता सरसकट पास करून पुढच्या वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानंतर आता इयत्ता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे काय करायचे यावरही बैठकीत चर्चा झाली. या विद्यार्थ्यांनाही सरसकट पास करायचे की वर्षभरातील मूल्यमापनावर निकाल जाहीर करायचा याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून सविस्तर प्रस्ताव शासनाने मागविला आहे. त्यानुसार तो शासनाला तत्काळ पाठविण्यात येणार आहे. त्यावर शासनाकडून आज निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.