विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर गुन्हे; पोलिसांनी दिलेले पास रद्द होणार
नव्या नियमांची कडक अंमलबजावणी
पुणे – करोना संसर्ग रोखण्यासाठी शहराच्या सीमा सील करण्याचे पालिका आयुक्तांनी रविवारी जाहीर केले. त्यावर पोलिसांनी सोमवारी दुपारी दोन वाजेपासून कडेकोट कर्फ्यू लागू केला आहे. शहरात अत्यावश्यक सेवांची दुकाने काही तासांसाठी सुरू राहणार असून, त्यात ऑनलाइन आणि घरपोच सेवा देणाऱ्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता पुणे पोलिसांनी दिलेले पासेस रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे नव्या आदेशाची शहरात आता कडेकोट अंमलबजावणी केली जाणार असल्याचे आदेश सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिले आहेत.
करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने देशभर टाळेबंदी आहे. मात्र, तरीही शहरात करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. काही नागरिकही विनाकारण बाहेर पडत आहेत. प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, तरीही शहरातील रुग्ण संख्या वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर विनाकारण फिरणारे, मास्क न वापरणारे तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून तीव्र कारवाई केली जात आहे.
त्याचा काही उपयोग होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता शहरात सोमवारी दुपारी 2 वाजेपासून दि. 27 एप्रिलच्या रात्री 12 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू केला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर काही बदल केले आहेत. मेडिकल, अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनाच यातून मुभा राहणार असून, पुणे पोलिसांनी दिलेले पासेस चालणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
असे आहेत नवीन नियम
– जीवनावश्यक वस्तू व सेवा (दूध व दुग्धोत्पादन, किराणा माल, फळे व भाजीपाला) पुरविणारे केंद्रे दिवसभरात फक्त चार तास म्हणजेच सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत सुरू असतील.
– इ-कॉमर्स म्हणजेच घरपोच किराणा माल, फळे व भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यासाठी फ्लिपकार्ट, ऍमेझॉन तसेच इतर ऑनलाइन सेवा देणाऱ्या उद्योगांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कामे करता येणार आहेत. त्याच वेळेत त्यांनी सेवा द्यायची आहे.
– खाद्यपदार्थ वितरण करण्यासाठी बिग बास्केट, स्विगी, झोमॅटो तसेच इतर ऑनलाइन सेवा देणाऱ्या उद्योगांना सकाळी 10 ते दुपारी 3 आणि सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सेवा देता येणार आहे.
– त्यात केवळ अत्यावश्यक व तातडीची औषधे ग्राहकांना घरपोच देण्यासाठी सूट असणार आहे.