पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे पुण्याच्या विविध भागात कर्फ्यु लावण्यात आला आहे. पुण्यात सिंहगड रोडवरील वडगाव धायरी व परिसरात कर्फ्यु लावण्यात आला. तसेच सिंहगड रोडवरील नर्हे, हिंगणे, धायरी व आजू बाजूंच्या परिसरातील रस्ते बंद करण्यात आले आहे. नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये असं अवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.
पुण्यात आज सकाळी ९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच ५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यात लॉकडाऊन असताना देखील काही नागरिक घराच्या बाहेर पडताना दिसत आहेत. तर बऱ्याच रुग्णांना होम क्वारंटाईन करण्याचे आदेश देण्यात आले होती. त्यापैकी काहींना आता कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सिंहगड रोडवर येणारे रस्ते, गल्ल्या, बॅरिकेट लावून बंद करण्यात आले आहे.
याबाबत सिहंगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके यांनी सांगितले की, या भागात होम क्वारंटाईन करण्यात आलेल्यांपैकी काही जण पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे सकाळपासून सिंहगड परिसरात कर्फ्यूची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याच्या बरोबर पोलिसांनी नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असं अवाहन देखील पोलिसांतर्फे करण्यात आले.