देहूरोड – करोनाचा दुसऱ्या लाटेच्या सुरक्षिततेसाठी देहूरोड येथे धम्मभूमी बुद्ध विहाराचे 66 वा वर्धापनदिनी गर्दी होवू नये. त्या पार्श्वभूमीवर परिसरात जमावबंदी लागू करत मंगळवारी (दि. 22) विहाराची पाहणी करण्यात आली.
देहूरोड धम्म बुद्ध विहाराचा शुक्रवारी (दि. 25) वर्धापन दिन संपन्न होत आहे. ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने परदेशातून येणाऱ्या विमानसेवा तत्काळ बंद करण्यात केले आहेत. त्याचा खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात तसेच नगरपालिका क्षेत्रात रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने देहूरोड येथील बुद्ध विहाराचे वर्धापन दिनी पूजा, धार्मिक विधी, बुद्ध वंदना कार्यक्रमानिमित्त 50 लोकांना परवानगी देण्यात आली. तसे ओळखपत्र नागरिकांना देण्यात येणार आहे.
एक दिवसासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून मुंबई-पुणे महामार्गावरील देहूरोड सेंट्रल चौक ते निगडी भक्ती-शक्ती दरम्यानचा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. सेंट्रल चौक मार्गे मुकाई चौक, रावेत मार्ग, निगडी अशी वाहतूक सुरू ठेण्यात येणार आहे. या परिसरात दुकाने थाटण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कॅंटोन्मेंट बोर्डतर्फे वैद्यकीय सेवा, मोबाइल टॉयलेट, पाणी टॅंकर व रुग्णवाहिका बॅरिकिड्ट करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सोशल मीडियाद्वारे करण्यात येणार असून, नागरिकांनी घरात बसून दर्शन घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच देहूरोड परिसर, चिंचोली किन्हईं, मामुर्डी या परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले असल्याने नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील, देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांनी पत्रकार परिषद माहिती दिली आहे.
पत्रकार परिषदेनंतर पोलीस उपायुक्त भोईटे, सहायक पोलीस आयुक्त नाईक, पोलीस निरीक्षक सोंडे वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक किशोर यादव, कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष, नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तू, बुद्ध विहार कृती समितीचे धर्मपाल तंतरपाळे, अशोक गायकवाड, अशोक सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते.