कुरकुंभ उड्डाण पूल कचऱ्याच्या विळख्यात

अनेक बेकायदेशीर वाहनांचे पार्किंग
पाटस टोल प्लाझाचे दुर्लक्ष
अन्नपदार्थांची विक्री उघड्यावरच

कुरकुंभ – येथील महामार्गावरील उड्डाण पूल सध्या अस्वच्छतेच्या विळख्यात अडकला आहे. पुलाखाल, तसेच पुलाच्या भिंतीच्या कडेला कचऱ्याचा ढील साचला आहे. हा कचरा तसाच पडून राहिल्याने येथे दुर्गंधी पसरलेली असते.कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळच परप्रांतीयांनी खाद्यपदार्थांच्या गाड्या थाटल्या आहेत, यामुळे या ठिकाणी उघड्यावरच खाद्य पदार्थांची खुलेआम विक्री केली जात असल्याचे चित्र आहे.

कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक वसाहत असल्याने या ठिकणी लोकांची रहदारी मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे या पुलाखाली अशा हातगाड्यावर खाद्यपदार्थ खाण्यासाठी लहान मुले, परप्रांतीय कामगार यांची सतत वर्दळ होत असते. मात्र, शेजारीच ओल्या व सुक्‍या कचऱ्याची दुर्गंधी पसरलेली आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे या भागात पसरणारा कचरा पाहता येथे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता नाकारता येत आणि त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. पुलाच्या कडेला काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असून, काही वेळा हा कचरा वाऱ्याने उडून अंगावर येत असल्याने नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.

पाटस टोलनाक्‍यावरील सबंधित अधिकाऱ्यांकडून स्वच्छतेबाबत फारसे गांभीर्य घेतले जात नाही. ऐन पावसाळ्यात या परिसरात पाणी साचते, त्यामुळे हा कचरा कुजून परिसरातील अस्वच्छतेत भरच पडते आहे, त्यामुळे या समस्येचा गंभीर्याने विचार करून टोल प्रशासनाने त्वरीत येथे कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

अस्वच्छतेची समस्या कायम
पुणे-सोलापूर महामार्ग विस्तारीकरणामुळे कुरकुंभ येथे मोठा उड्डाण पूल उभारण्यात आला आहे. रहदारीचा विचार करून पुलाला दोन मोठ्या मोरी केल्या आहेत. या पुला खाली अनेक वाहने बेकायदा उभी केलेली असतात. याचा आधीपासूनच त्रास होत असताना आता या भागातील कचऱ्यामुळे नागरिकांची डोके दुखी वाढली आहे. सध्या पुलाच्या भिंतीच्या कडेला तसेच पुलाच्या खाली देखी, कचरा टाकला जात आहे.

उड्डाणपुलाभोवती कचऱ्यामुळे जागोजागी अस्वछता पसरली आहे. त्यामुळे सेवा रस्त्याने जाताना अस्वच्छतेचा सामना करण्याची वेळ नागरिकांवर येत आहे.हा मुख्य चौक असल्याने या ठिकाणी लोकांची वर्दळ असते. कचऱ्यामुळे येथील येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा उपद्रव सहन करावा लागत आहे. एकी कडे “स्वच्छ भारत’ अभियानाचा डिंगोरा पिटला जात असताना दुसरीकडे राष्ट्रीय महामार्गच अस्वच्छ होत असल्याचे चित्र कुरकुंभ येथे पाहायला मिळत आहे.

कुरकुंभ (ता. दौंड) येथील पुलाखाली काही दिवसांपूर्वीच स्वछता केली होती. गुरुवारी आठवड्याचा बाजार असल्याने येथील रहदारीने कचरा झाला असेल, येत्या दोन दिवसांत पुलाखाली स्वछता करण्यात येईल.

– सुनील तिवारी, रस्ते देखभाल व दुरुस्ती व्यवस्थापक, पाटस टोल प्लाझा 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)