सुसंस्कृत आणि संस्कारी फुटबॉलपटू

अन्न हेच पूर्णब्रह्म, असे आपल्याकडे म्हटले जाते. परदेशी व्यक्‍तीला त्याचे काही गांभीर्य असेल असे आपल्याला वाटतच नाही. मात्र, साता समुद्रापारही संस्कृती असते हे देखील अनेकदा समोर येते व आपल्याला त्याचे कौतुकही वाटते. खरेतर परदेशी व्यक्‍तींचेच आपल्याला जरा जास्त कौतुक असते व ते जेव्हा भारतीय संस्कृतीचे अनुकरण करताना दिसतात तेव्हा तर अभिमानाने उर भरून येतो. याचेच एक मूर्तिमंत उदाहरण युरो कप लीग फुटबॉलमध्ये दिसले व त्यामुळे मॅसुट ऑझील नावाचा एक खेळाडू अवघ्या जगात नावाजला गेला तसेच कौतुकाचा व आदराचा विषय बनला.

मॅसुटला “द असीस्ट किंग’ या नावाने जागतिक फुटबॉलमध्ये ओळखले जाते. मूळचा जर्मनीचा हा खेळाडू आपल्या सुसंस्कृत व संस्कारी वर्तनामुळे जागतिक फुटबॉल क्षेत्रात अत्यंत आदराचे स्थान मिळवत आहे. वयाच्या 32 व्या वर्षी व्यावसायिक फुटबॉलमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलेल्या काही निवडक खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होतो. युवा मिडफिल्डर म्हणून कारकिर्दीला प्रारंभ केल्यापासून आतापर्यंत त्याच्या नावावर जवळपास 300 सामन्यांत 97 गोल आहेत. गोलसंख्या कमी वाटत असली तरीही एका मिडफिल्डरने केलेले हे गोल आहेत हे सांगितल्यावर फुटबॉल प्रेमींना त्याचे आणखी विश्‍लेषण द्यावे लागणार नाही.

2010 साली फिफा विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत त्याने पदार्पण केले व घानाविरुद्धच्या सामन्यात महत्त्वपूर्ण गोल करत संघाला बाद फेरी गाठून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. 2012 सालच्या युएफा फुटबॉल स्पर्धेत आपल्या देशाला पात्र ठरवण्यात त्याच्या कामगिरीचा खूप मोठा वाटा होता. याच साली त्याच्या कामगिरीच्या जोरावर त्याला जर्मनीचा वर्षातील सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटूचा पुरस्कारही मिळाला होता. 2014 सालच्या फिफा विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतही त्याने जर्मनीकडून सर्वाधिक आठ गोल करत संघाच्या यशस्वी वाटचालीत आपले मोठे योगदान दिले होते. 2016 सालच्या युएफा तसेच 2018 सालच्या फिफा विश्‍वकरंडक स्पर्धेतही त्याने आपल्या गुणवत्तेचे दाखले दिले.

अखेर त्याने 2018 साली व्यावसायिक तसेच सर्व स्तरांवरील फुटबॉलमधून निवृत्ती घेतली. ही निवृत्ती त्याने मनापासून घेतलेली नव्हती तर त्याने जर्मनीतील एका वादग्रस्त नेत्याला निवडणुकीत पाठिंबा दिला होता व त्यावरून मोठा वाद घडला होता. त्यामुळे अखेर व्यथित होत त्याने निवृत्ती घेतली. केवळ खेळातूनच नव्हे तर राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातूनही त्याने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. आजही जर्मनीच्या फुटबॉल क्षेत्रात त्याच्या खेळाचे रेकॉर्डिंग पाहिले जाते व नवोदित खेळाडू त्याचे अनुकरणही करतात.
अन्न हेच पूर्णब्रह्म
युरो कप फुटबॉलच्या एका सामन्यात प्रेक्षकांमधून कोणीतरी पावाचा तुकडा मैदानावर मॅसुटच्या दिशेने भिरकावला. खरेतर त्याने त्याकडे दुर्लक्ष केले असते तरी कुणी काही बोलले नसते. मात्र, इथेच संस्कार येतात. जवळपास चारशे कोटी कमाई करणारा तो अब्जाधीश फुटबॉलपटू होता. तो दोन विश्‍वकरंडक खेळला होता आणि त्यातील एक विश्‍वकरंडक जर्मनीला जिंकून देण्यात त्याचाही वाटा होता. त्याने उर्मटपणे काहीही केलं असतं तरी ते त्याला शोभूनही दिसले असते. मात्र, त्याने असे काही केले ज्यामुळे जगातील करोडो फुटबॉल शौकिनांच्या हृदयालाच त्याने हात घातला. त्याची ती एक छोटीशी पण अनपेक्षित कृती करोडो लोकांना “अन्न हेच पूर्णब्रह्म’ हा संदेश देऊन गेली.

प्रेक्षकांमधून फेकण्यात आलेला तो पावाचा तुकडा त्याने अत्यंत विनम्रपणे उचलला. दोन्ही हाताने हळुवारपणे धरून त्याने तो तुकडा आपल्या कपाळाला लावून पावाच्या त्या तुकड्याचे म्हणजेच अन्नाचे कृतज्ञपणे आभार मानले अन्‌ तो तुकडा त्याने मैदानाच्या बाहेर ठेवला. आपणही अनेकदा पोट भरले की उरलेले अन्न वाया घालवतो. एकीकडे अनेकांना आजही उपाशी झोपावे लागते तर दुसरीकडे अन्नाची नासाडीही होताना दिसते. अशांसाठी मॅसुट एक आदर्श ठरावा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.