संस्कार अन्‌ संस्कृती

आपले संस्कार अन्‌ संस्कृती आपणच जतन करायला हवी, असे फार पूर्वीपासून सांगितले जात होते, आताही हेच सांगितले जाते. हा प्रश्‍न अलीकडे करोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर ऐरणीवर आला. अनेक वयस्क तज्ज्ञांचे या पार्श्‍वभूमीसंदर्भात असे म्हणणे आहे की, “ऋषी-मुनी, संत-महात्मे आणि लोकोत्तर व्यक्‍तींनी आपल्या देशाची पूर्वापार संस्कार व संस्कृती याचे काटेकोर पालन केले म्हणूनच ते निरोगी राहिले आणि शेकडो वर्षे आनंदी व समाधानी जीवन जगले. तेच संस्कार अन्‌ तीच संस्कृती अलीकडच्या काळात आपण विसरलो म्हणूनच करोना विषाणूला आपल्यावर हल्ला करण्याची संधी मिळाली.

आपली अवस्था ही, ना आपण भारतीय राहिलो, ना परदेशी! आपण मधल्यामध्ये लटकत राहिलो अशीच झाली. आपण हे विसरलो की, आपण मूळ भारतीय आहोत. ते या देशातील कोणत्याही प्रांतातील असू, पण आपली नाळ ही भारतमातेच्या संस्काराशी व संस्कृतीशी घट्ट जोडलेलीच आहे. आपल्याकडे पिढ्यान्‌पिढ्या वनौषधी आणि आयुर्वेदाचा उच्च वारसा होता व अजूनही आहे, हेच आपण पूर्ण विसरून गेलो. आपण या “झटपट’च्या जमान्यात परकियांनी आणलेल्या “ऍलोपॅथी’च्या जाळ्यात अडकत गेलो. योग व व्यायाम हे आपणच जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. पण आपण मात्र, त्याच्याकडे पूर्ण पाठ फिरवली अन्‌ फक्‍त सरकारच्या नावे बोटे मोडत राहिलो.

वयस्कर तज्ज्ञांनी मांडलेल्या विचारांवर विचार करताना संस्कृती, परंपरा व संस्कार म्हणजे काय? या मूळ प्रश्‍नाकडे आपण वळतो, त्यावेळी त्याच्या उत्तरात पुढील दोन उदाहरणे समोर येतात. 1) आपण स्वतः भूक लागल्यावर अन्न खातो, याला “प्रकृती’ म्हणतात. अन्‌ त्याच वेळेस दुसरा भुकेलेला आल्यावर आपल्या अन्नातील घासातला घास त्याला देतो ह्याला “संस्कृती’ म्हणतात. अन्‌ त्या भुकेलेल्यास अन्न न देणे याला “विकृती’ म्हणतात. 2) छोट्या मोठ्या आकाराच्या दगडधोंड्यांवर “संस्कार’ करून शस्त्रे तयार केली जात त्याला “पाषाण संस्कृती’ म्हटले जाते. दगडधोंड्यांवर संस्कार करून त्यातून सुंदर व सुबक मूर्ती बनवली जाते. तीच आदर्श व उच्च कोटीतील “सिंधू वा हिंदू संस्कृती’. त्याची आपणच अवघ्या जगाला देणगी दिली आहे. याच मूर्तीवर “मंत्र संस्कार’ केल्याने त्याच्यात दैवत्व येते. तेच दगड दुसऱ्याच्या डोक्‍यात घालून हत्या करणे, तेच दगड वापरून सार्वजनिक वाहने, रुग्णालये, रेल्वे, कार्यालये फोडणे याला “दानव संस्कृती’ म्हणतात.

याच संदर्भात आणखी एक उदाहरण देता येते. ज्या मातेच्या दुधावर तुम्ही मोठे होतात त्याच मातेला मालमत्तेसाठी मारहाण करता किंवा ठार मारता. तिला मोलकरणीपेक्षाही वाईट अवस्थेत जगवता. पुरेसे अन्नही देत नाही किंवा तिची हकालपट्टी करता, तिची रवानगी वृद्धाश्रमात करता. याला संस्कृती म्हणायचे की विकृती, हे तुम्हीच ठरवा. देवापेक्षा माता श्रेष्ठ असते हे गुरुचरित्रात व देव-देवतांच्या चरित्रात सांगितले आहे. ते वाचून बोध कोणी घ्यायचा? आणि स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेण्याचा टेंभा कोणी मिरवायचा? हे ज्यांचे त्यांनी ठरविण्याची हीच वेळ आहे.

तेव्हा जेथे काही संस्कारांनी एखादी गोष्ट सुंदर, शुद्ध, समृद्ध व दीर्घायुषी होते, तिथे संस्कृतीचा जन्म होतो. म्हणूनच प्रत्येक व्यक्‍तीने दुसऱ्याला सुधारणा करणाऱ्या वा दुसऱ्यांमध्ये बदल घडवून आणणारे उपदेशांचे डोस पाजण्यापेक्षा तसा बदल स्वतःमध्ये घडवून आणणे जास्त महत्त्वाचे असते. त्याकरता स्वतः रोजच्यासाठी काही नियम करून वेळापत्रक बनवून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा कायमस्वरूपी निर्धार करूया.

आज आपले कुटुंब आनंदात, निरोगी व समाधानी आयुष्य जगत आहे हे पाहून इतरांना आपोआपच प्रेरणा मिळेल. जेव्हा एखादा समूह चांगले संस्कार आत्मसात करतो तेव्हा त्या समूहाला “टोळी’ म्हणत नाहीत. त्याला त्या समूहाची “संस्कृती’ म्हणतात.

आपला भारत जगातील असा एकमेव देश आहे की, ज्याला किमान आठ हजार वर्षांची सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. ती पाश्‍चात्यांचे अंधानुकरण करून नव्हे तर ती परंपरा समजावून घेऊन ती मनावर बिंबवून आणि त्याचे काटेकोर आचरण करूनच हे लाभले आहे. म्हणून भारतीय जगण्याच्या कलेला सर्वजग “सांस्कृतिक वारसा’ असे म्हणतात. संस्कारानेच संस्कृती निर्माण होते. ती संस्कार करून जपली तर “सांस्कृतिक वारसा’ ही संज्ञा सार्थक ठरते. सांस्कृतिक वारसा हा जीवनाचा पाया आहे. तो भक्‍कमच ठेवण्याचे काम मात्र माणसाला हवेच.

मधुकर पुरंदरे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.