पुणे –सांस्कृतिक मैफिली, कार्यक्रम आणि पुणे शहराचे अनोखे समीकरण आहे. रोज शहराच्या विविध नाट्यगृहे, कलादालने, सभागृहांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमांवर पडदा पडला आहे. त्यामुळे कलाकार, तंत्रज्ञांसह महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.
करोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाले. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम स्थगित झाले. मागील तीन महिन्यांपासून कार्यक्रम झाले नसल्याने सांस्कृतिक राजधानी असणारे पुणे सुनेसुने झाले आहे. मार्च, एप्रिल, मेदरम्यानचे महोत्सव, व्याख्यानमाला, पुरस्कार सोहळे, बालनाट्ये, नाटकांच्या प्रयोगांसह सामाजिक, राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र, हे ठप्प झाल्याने अनेकांच्या रोजगारांवरही गदा आली आहे.
रंगमंच तिसऱ्या घंटेच्या प्रतीक्षेत
प्रेक्षकांची गर्दी… भव्य रांगोळ्या… सजावट… तिसरी घंटा… पुस्तक विक्रीचे स्टॉल… बुकिंग खिडक्यांवरच्या रांगा… सनईचे आवाज… नाटकांच्या प्रयोगावेळी कलाकारांची गडबड… मैफिलींचे स्वर… आयोजकांची रेलचेल आदींनी नेहमी सभागृहे, नाट्यगृहांची आवारे भारावलेली असतात. मात्र, सध्या लॉकडाऊनमुळे ही आवारे शांतच आहेत.
पालिकेचे उत्पन्नही “लॉक’
शहरातील 14 नाट्यगृहे महापालिकेच्या ताब्यात आहेत. यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर, अण्णा भाऊ साठे नाट्यगृह, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पंडित नेहरू सभागृह आदींचा समावेश आहे. येथे मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र, यंदा सर्वच कार्यक्रम रद्द झाले. त्यामुळे आयोजकांना आता सोयीनुसार पुढील तारीख देण्यात आली आहे. काही नाट्यगृहे करोनाबाबतच्या कामासाठी देण्यात आली आहेत. महापालिकेला फेब्रुवारीत नाट्यगृहांद्वारे सुमारे 38 लाखांचे उत्पन्न मिळाले होते. परंतु, करोनामुळे सर्वच उत्पन्न “लॉक’ झाले आहे. त्यामुळे प्रशासनदेखील हतबल झाले आहे.
महापालिकेच्या सर्व नाट्यगृहांचे उत्पन्न बंद आहे. मार्चपर्यंत अनेक कार्यक्रमांचे बुकिंग झाले होते. संबंधित आयोजक भविष्यात कार्यक्रमांचे आयोजन करणार असतील, तर त्यांना पुढील तारखा देण्यात येणार आहेत. परंतु, सध्या बुकिंग बंदच आहे. सध्या वापर नसल्याने विद्युत विभागाकडून देखभाल करण्यात येत आहे.
– सुनील मते, रंगमंदिर व्यवस्थापक, पुणे महापालिका