सांस्कृतिक परिवर्तन व आजचे वर्तमान

मराठी भाषा दिन उद्धव कानडे, कवी

येत्या 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा होत असतानाच आपल्याला मिळालेला सांस्कृतिक वारसा आपण समजून घेतला पाहिजे. जाती-धर्मावरून होणारे वाद आणि पडत जाणारं अंतर कमी करता आलं पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातून तरुणांना याचं ज्ञान दिलं पाहिजे. समाजात समतेचा विचार वाढला पाहिजे. माणूसपणाचा, माणूसधर्माचा आणि माणुसकीचा धागा मनात बळकट झाला पाहिजे. त्यासाठी समाजात प्रेमभावना वाढीस लागायला हवी. प्रेम म्हणजे संस्कृतीचा आणि जीवनाचा विकास आहे.

साहित्य आणि कला म्हणजे संस्कृतीला आलेला सुंदर मोहर असतो. साहित्य विचारातून आणि कलेच्या आविष्कारातूनच मानवी संस्कृती फुलते, उमलते. सर्वांगाणं संस्कृतीची रचना करणारी शक्ती म्हणजे कला आणि साहित्य हीच आहे. ज्ञानाच्या आणि विचाराच्या दिशा उजळून निघाल्याशिवाय माणसाला मनाचे सुंदर आकाश दिसणार नाही. माणसाविषयी वाढणारी आपुलकी, प्रेमभावना, समता, बंधुता आणि सहिष्णुता आणि करुणा हीच मनाला सत्याच्या आणि संस्कृतीच्या जवळ घेऊन जाते. ज्ञानाची, विचारांची पावती देणारं साहित्य, कला आणि आचरण चिरकाल टिकून राहतं.

मानवी मनाची मशागत करताना माणसांना जोडण्याचं काम करतं. माणसं जोडण्याच्या विचारातूनच सांस्कृतिक नव जग, सुंदर समाज उभा करता येतो. आपल्या भोवती पसरलेल्या विराट जीवनाचा आणि वर्तमान जगण्याचा शोध घेणारे कलावंत, साहित्यिक, विचारवंत म्हणूनच महत्त्वाचे असतात. जीवनावर भाष्य करणं, हाच साहित्य व कलेचा प्रधान हेतू असतो. जीवनाचा शोध म्हणजे माणसाचा शोध, सत्याचा शोध, मनाचा शोध असतो. प्रतिभावंतांना वास्तवाचा स्पर्श झाल्यावर वेदना शब्दातून बोलू लागतात. तेव्हाच आशयाचं सुंदर आकाश आणि जीवनातलं सौंदर्य रसिकांना अनुभवता येतं. सांस्कृतिक सुंदरता तेव्हाच अनुभवता येते, जेव्हा मनाचा पीळ आणि विचारांचं बळ प्रतिभावंतांच्या साहित्यात उतरतं. गेल्या 25 वर्षांत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात आमूलाग्र बदल झाले आहेत. इथल्या समाजानं खूप मोठे चढ आणि उतार अनुभवले आहेत. बघता बघता समाज विज्ञानवादी झाला. विज्ञानानं सारं जग घरात आणलंय पण माणसाचं खरंखुरं सुसंस्कृत घर रस्त्यावर आलंय.

आजच्या विज्ञानवादी समाजात जातीधर्माच्या भिंती अधिक बळकट होत आहेत. या भिंतींना शिड्या लावून राजकारणी सत्तेचं सिंहासन मिळवू पाहत आहेत. या भारतीय समाजात कुठल्याही नशेपेक्षा धर्माची आणि जातीची नशा ही एक शोकांतिका बनली आहे. हजारो वर्षांपासून उभ्या असलेल्या या भेदाच्या भिंती कोणाला पाडता आल्या नाहीत. गेल्या 25 वर्षांत झालेला बदल आपण संस्कृतीला बरोबर घेऊनच स्वीकारला पाहिजे. ज्ञानोपासना आणि विचारसाधना हाच आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. आपलं सांस्कृतिक जीवन हे त्यागावर आधारलेलं असलं पाहिजे. चांगलं चारित्र्य हीच समाजाची खरी संपत्ती आहे. मूल्यविचारांच्या आचरणातून राष्ट्राचे चारित्र्य घडत असते. चारित्र्याशिवाय माणूस मोठा होणार नाही.

आपल्या शिक्षण संस्थाचं आज काय झालंय? शिक्षणसंस्था व्यवहाराची केंद्र बनली आहेत. ती ज्ञानमंदिरं बनली पाहिजेत. ज्ञानमंदिरांना विचारांचं अधिष्ठान असावं लागतं. माणूस जोडण्याचं, माणूस समजून घेण्याचं शिक्षण मुलांना मिळायला हवं. जीवनातल्या सुंदरतेचा आणि मातृभाषेतल्या सौंदर्याचा अर्थ मुलांना कळायला हवा. मनाचा विकास हाच संस्कृतीचा विकास असतो. हा विकास झाल्यावरच कलावंत, प्रतिभावंत, कवी आपल्या प्रतिभेतून सौंदर्याची निर्मिती करतो. ज्ञान, विचार आणि कला संस्कृती उजळून टाकत असतात. जीवनातलं सौंदर्य आणि संस्कृतीची खोली कळायला मनाची बाग विचारांनी फुलून यावी लागते. असं घडलं तरच आपण सांस्कृतिक परिवर्तन घडवलं असं म्हणू शकतो. पण असं परिवर्तन आजच्या वर्तमान समाजात दिसत नाही.

आपण कधी उदात्त विचारांनी प्रभावित होत नाही. एखाद्या कलेचा निर्मळ ध्यास घेत नाही. कधी चांगलं साहित्य वाचत नाही. भोवतालच्या माणसांना समजून घेत नाही. घरातल्या माणसांची सुख-दुःखं जाणत नाही. स्वतःच स्वतःशी संवाद करत नाही. आपल्या मराठी भाषेचा ग्रंथव्यवहार पाहिला तर असं लक्षात येतं की, मराठी पुस्तकं भरपूर छापली जातात. सगळ्याच वाङ्‌मय प्रकारात भरपूर लेखन होत आहे. पुस्तकांची छपाई म्हणजे सांस्कृतिक वाङ्‌मयीन समृद्धी नव्हे. त्या प्रमाणात वाचक निर्माण होणं, वाचनसंस्कृती श्रीमंत होणं म्हणजे सांस्कृतिक समृद्धी होणं आहे.

गेल्या 25 वर्षांपासून आजतागायत सांस्कृतिक क्षेत्रात महाराष्ट्राची मोठी घोडदौड सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने देशातलं पहिलं पुस्तकाचं गाव उभं केलं. सातारा जिल्ह्यात पाचगणीजवळचं “भिलार’ हे “देशातलं पहिलं पुस्तकांचं गाव’ म्हणून गाजत आहे. भिलारच्या घराघरात ग्रंथालयं निर्माण केली. त्यातून मराठी वाचकांची संख्या वाढण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. “पुस्तकांच्या गावा’तल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनाही मराठी लेखकांची नावं आणि पुस्तकं माहिती झाली आहेत! महाराष्ट्राच्या विविध भागात अनेक प्रकारची साहित्य संमेलनं सतत भरत असतात. ही छोटी छोटी साहित्य संमेलने किती महत्त्वाची आहेत. या छोट्या संमेलनांनी मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह समृद्ध केला आहे. अशा छोट्या संमेलनाची मराठी भाषेला मराठी समाजाला नितांत गरज आहे. शासनाने या संमेलनांना पूर्ण ताकद दिली पाहिजे.

साहित्य विचारांमुळेच समाजपरिवर्तनाची, प्रबोधनाची वाट सशक्त होऊ शकते. साहित्य हेच समाजमनाचा आरसा असते. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून सर्व वर्गातून विपुल संत साहित्य निर्माण होत आहे. या नव्या दमाच्या बदलत्या युगाच्या तरुण साहित्यिकांना अ.भा.म. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर मानानं अभिव्यक्त होण्याची संधी दिली पाहिजे. जीवनाच्या विविध अंगांनी आणि विविध पैलूंचं दर्शन जेव्हा साहित्यात घडू लागतं तेव्हाच खऱ्या अर्थानं साहित्यविश्‍वात आणि सांस्कृतिक जगात परिवर्तन झालं असं म्हणावं लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.