शिरूर : पुण्यातील शिरूर तालुक्यातील शेतकऱ्याने कोथिंबीरीची लागवड करत लाखो रुपयांची कमाई केली आहे. सध्या शेतकरी पारंपारिक शेतीसह आधुनिक पद्धतीचा वापर करतानाही दिसत आहे. त्यानुसार पिकाचे योग्य व्यवस्थापन आणि नियोजन करून कमी खर्चात या शेतकऱ्याने 21 लाख रुपयांची कमाई केली आहे.
शिरूर मधील कैलास नळकांडे हे आपल्या कुटुंबीयांसह गेल्या 30 वर्षापासून या भागात शेती करतात. सुरुवातीच्या काळात येथे पाण्याचा तुटवडा होता, परंतु चासकमान धरणामुळे धरण क्षेत्रातील गावांना याचा फायदा झाला. तसेच या ठिकाणचे शेतकरी पालेभाज्यांचे उत्पन्न घेऊ लागले. यंदा त्यांनी साडेसहा एकर क्षेत्रामध्ये कोथिंबिरीचे उत्पन्न घेतले आणि यातून त्यांना आर्थिक फायदा देखील झाला.
सध्या कोथिंबीरीला परराज्यातून मोठी मागणी आहे. कैलास नळकांडे यांनी बाजारातून अशोका जातीचं कोथिंबीरीचं बियाणं विकत आणलं. स्प्रिंकलर पद्धतीनं पिकाला पाणी देत खतही टाकलं. वेळोवेळी फवारण्या आणि पाणी दिल्यानं कोथिंबीरीच्या जुड्या निघाल्या. कोथिंबीरीतून मिळालेल्या यशानंतर त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
याबाबत शेतकरी कैलास नळकांडे यांनी सांगितले की, “सुरुवातीला फायदा झाला नाही. पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र मागील वर्षापासून भरपूर उत्पन्न मिळाले. या वर्षीही पहिले दोन महिने तोट्यात होतो. परंतु कोथिंबीरीच्या लागवडीमधून् आम्हाला चांगली रक्कम मिळाली. आयुष्याची कमाई शेतीत गुंतवली. आम्ही तिघे भावडांसह आई आणि वडील शेतीसाठी मेहनेत घेतो. थोरले बंधुंनी कायम प्रोत्साहन दिले. त्यानुसार खताचे आणि पाण्याचे नियोजन करून कष्ट केल्याने मोठे यश आम्हाला मिळाले आहे.”