केळी-रुम्हणवाडीतील घटना ः दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल
अकोले – सामायिक बांधावरील सागाची झाडे तोडण्याच्या कारणावरून चुलता व पुतण्यांत तुंबळ हाणामारी झाला. त्यात चुलत्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.2) रात्री साडेदहा वाजता अकोले तालुक्यातील केळी-रुम्हणवाडी येथील परदेशवाडी शिवारात घडली. या प्रकरणी दोघांच्या विरोधात अकोले पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवृत्ती तुकाराम सूर्यवंशी (वय-48, रा. परदेशवाडी, केळी-रुम्हणवाडी, ता.अकोले) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अकोले पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, अकोले तालुक्यातील केळी-रुम्हणवाडी येथे सूर्यवंशी कुटुंबाची सामायिक शेती आहे. त्यांचा पुतण्या बाहेरगावी राहतो. सामायिक शेतातील सागाची झाडे तोडण्याच्या कारणावरून चुलते निवृत्ती सूर्यवंशी व त्यांचे दोन पुतणे यांच्यात घरी शाब्दिक खडाजंगी झाली. त्यानंतर या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यात वरील दोघांनी निवृत्ती यास लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. तसेच पायाची हाडे तोडली. त्यात निवृत्ती यांचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी मयत निवृत्ती सूर्यवंशी यांचे बंधू कचरू तुकाराम सूर्यवंशी यांनी फोनवरून पोलीस पाटील जनार्दन बिन्नर यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटील बिन्नर यांनी घटनेची माहिती अकोले पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत निवृत्तींचे बंधू कचरू तुकाराम सूर्यवंशी यांनी अकोले पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून बाबूराव रघुनाथ सूर्यवंशी व गोपाल रघुनाथ सूर्यवंशी (रा. सांगवी, ता. अकोले) या दोघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.