पुणे – करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या आजाराच्या निदान तात्काळ व्हावे, यासाठी स्वॅब तपासणीबरोबरच सिटी स्कॅनचा वापरही वाढलेला आहे. त्यामुळे सिटी स्कॅन चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी आरोग्य विभागाने राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमली आहे. सात दिवसांत समिती अहवाल सादर करेल, असे .आरोग्य विभागाने सांगितले.
यासंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी अध्यादेश जारी केला आहे. या पूर्वीदेखील करोना आणि इतर रुग्णांच्या तपासणीसाठी खासगी रुग्णालयांनी आकारण्याचे दर तसेच खासगी प्रयोगशाळांनी आरटी-पीसीआर, रॅपिड ऍन्टिजेन, ऍन्टिबॉडी चाचण्यांसाठीचे दर निश्चित केले आहेत.
करोना रुग्णांच्या तपासणीसाठी सिटीस्कॅन चाचणी महत्त्वाची ठरू लागली आहे. परिणामी, खासगी रुग्णालये किंवा सिटीस्कॅन सुविधा असलेल्या केंद्रांकडून जादा रक्कम आकारली जात असल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्या तक्रारींची दखल घेऊन आरोग्य विभागाने स्वॅब चाचणीनंतर आता सिटी स्कॅनचे दर निश्चितीचा मार्ग स्वीकारला आहे. त्याकरिता “एचआरसीटी’ अर्थात हाय रिझोल्युशन कॉम्प्युटराइज्ड टोमोग्राफी चाचण्यांचे दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
7 दिवसांत अहवाल द्यावा लागणार
आरोग्य सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती नेमण्यात आली आहे. या समितीत एलटी वैद्यकीय महाविद्यालय आणि सायन रुग्णालयाच्या रेडीऑलॉजी विभाग प्रमुख डॉ. अनघा जोशी, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता हे सदस्य आहेत. तसेच आरोग्य विभागाचे संचालक हे समितीचे सदस्य सचिव आहेत. ही समिती एचआरसीटी चाचणीच्या दर निश्चितीसाठी खासगी रुग्णालये व एचआरसीटी चाचणी केंद्रांशी चर्चा करुन सात दिवसांत सरकारला अहवाल सादर करेल.
…म्हणून सिटी स्कॅन चाचणीला महत्त्व
करोना बाधितांत न्यूमोनिया होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यांच्या छातीत न्यूमोनियाचे पॅचेस अधिक येण्याचे प्रमाण दिसताच आणि रुग्णाला कोणतीही लक्षणे नसल्यास त्या रुग्णाला पॉझिटिव्ह, की निगेटिव्ह म्हणून ग्राह्य धरावे? याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांपुढे संभ्रम निर्माण झाला होता. त्यावेळी वैद्यकीय तज्ज्ञांनी सिटी स्कॅनद्वारे न्यूमोनियाच्या आजाराचे निदान करून त्या रुग्णाला पॉझिटिव्ह म्हणून ग्राह्य धरण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे सिटी स्कॅन चाचणीला विशेष महत्त्व आले होते.