अंतिम सामन्यातील त्याची खेळी ठरतेय चर्चेचा विषय
हैदराबाद – आयपीएलचा बारावा मोसम संपला असून मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करत यंदाचे विजेतेपद पटकावले. मात्र, थरारक अशा अंतिम सामन्यातील अनेक पैलू बाहेर येत असून या सामन्यात चेन्नईचे इतर फलंदाज अपयशी ठरत असताना शेन वॉटसनने एका बाजुने झुंजार खेळी करत संघाच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्टा लावली. विशेष म्हणजे त्याने ही खेळी जायबंदी असताना केल्याने त्याचे कौतुक होत आहे.
चेन्नईला विजय मिळवून देण्यासाठी अखेरपर्यंत संघर्ष करणारा वॉटसन हा दुखापरग्रस्त होता. त्याच्या डाव्यापायाच्या मांडीतून रक्तस्त्राव होत होते. पण तरीही तो संघासाठी खेळपट्टीवर उभा राहिला. चेन्नईचा फिरकीपटू हरभजन सिंगने ही गोष्ट अभिमानाने सर्वांना सांगितली. सामन्यानंतर वॉटसनच्या जखमेवर सहा टाके बसले. वॉटसनच्या या लढाऊ बाण्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
चेन्नई संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग याने याबाबत माहिती दिली. त्याच्या (वॉटसन) गुडघ्याजवळ असलेलं रक्त तुम्ही पाहू शकता का? सामन्यानंतर वॉटसनला तब्बल 6 टाके पडले. मैदानावर डाइव्ह मारताना त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली, पण कोणालाही काहीही न सांगता वॉटसन एकटा खेळत राहिला, असे हरभजनने इंस्टाग्रामच्या स्टोरीवर लिहिले आहे. या बरोबरच त्याने वॉटसनच्या खेळीचीही स्तुती केली.
अंतिम सामन्यात मुंबईने दिलेल्या 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला एका चेंडूंत 2 धावा हव्या होत्या. पण अनुभवी लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर गडी बाद केला आणि मुंबईला विजेतेपद मिळवून दिले. यावेळी चेन्नईकडून शेन वॉटसनने एकाकी झुंज दिली. एका बाजूने गडी बाद होत असताना शेन वॉटसनचे मात्र संयमी खेळी करत झुंजार अर्धशतक ठोकले.
अर्धशतकानंतर त्याने तुफान फटकेबाजी केली पण दुहेरी धाव घेताना तो शेवटच्या षटकात 80 धावांवर धावचीत झाला. त्याने 59 चेंडूत 80 धावा केल्या. पण महत्वाचे म्हणजे ही खेळी त्याने पायाला दुखापत झालेली असताना आणि त्या जखमेतून रक्त वाहत असताना केल्याचे फोटो ट्विटरवर संघातील सहकारी हरभजन सिंगने पोस्ट केले आहेत.