चेन्नई – भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने चेन्नई सुपर किंग्जच्या सराव सत्रात तुफान फटकेबाजी केली. त्याने मारलेला एक षटकार मैदानाच्या रुफवर पडला. 114 मीटर अंतरावर म्हणजेच इतक्या उंचीवर व लांब फटकावलेला हा षटकार खरेतर अष्टकार समजण्यात यावा, अशा शब्दात सोशल मीडियावर धोनीच्या चाहत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेसाठी चेन्नईचा संघ सध्या कसून सराव करत आहे. या सराव सत्रात कर्णधार धोनी आणि सुरेश रैनासह अनेक खेळाडू सहभागी झाले होते. त्यांनीही सरावात आक्रमक फलंदाजी केली मात्र, चर्चा केवळ धोनीने फटकावलेल्या उत्तूंग षटकारांचीच रंगली.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेला येत्या 9 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत चेन्नई संघाचा सलामीचा सामना 10 एप्रिलला मुंबईतील वानेखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. याआधी व्हायरल झालेल्या सरावाच्या एका व्हिडिओत हरिशंकर या युवा गोलंदाजाने धोनीचा त्रिफळा उडवला होता. मात्र, आपणच फिनिशर असल्याचे धोनीने सोमवारच्या सराव सत्रात दाखवून दिले.