अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांच्या आगामी “चेहरे’ चित्रपटाची सध्या खूपच चर्चा आहे. या चित्रपटात अमिताभ आणि इमरान यांच्याशिवाय कृति खरंबदा यांना कास्ट करण्यात आले होते. मात्र, कृतिने पहिल्या शेड्यूलमधील शूटिंग पूर्ण केल्यानंतर चित्रपट सोडला आहे. आता नवीन अभिनेत्रीचा शोध सुरू आहे.
या भूमिकेसाठी मौनी रॉय आणि अंकिता लोखंडे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. परंतु, या दोघीं ऐवजी क्रिस्टल डिसूजाची या भूमिकेसाठी निवड करण्यात आल्याचे समजते. क्रिस्टल डिसूजा ही टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने “एक हजारो मे मेरी बहना है’, “एक नई पहचान’ आणि “ब्रह्मराक्षस’ यासारख्या पॉप्युलर सीरियलमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.
ही भूमिका साकारण्यासाठी क्रिस्टलने ऑडिशन दिले होते. त्यानंतर तिची निवड करण्यात आली. दरम्यान, चित्रपटातील काही इंटिमेट सीनला आक्षेप घेत कृतिने या चित्रपटातून काढता पाय घेतला. या चित्रपटाचे दिग्दर्शन रुमी जाफरी करत असून पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.