सोशल मीडियातून झाली होती ओळख
पुणे – क्रिप्टोकरन्सी आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने मार्केटयार्ड भागातील एका महिलेची 45 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, दीपक चौधरी (रा. दिल्ली), भवानीप्रसाद सेंगू (रा. आकुर्डी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार महिलेची आरोपीं बरोबर दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियाद्वारे ओळख झाली होती. त्यावेळी चौधरीने महिलेकडे गुंतवणूक सल्लागार असल्याची बतावणी केली. आभासी चलनात गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, असे आमिष तिला दाखवण्यात आले होते. त्यानंतर महिलेला बॅंक खात्यात वेळोवेळी पैसे भरण्यास सांगितले.
महिलेने वेळोवळी वेगवेगळ्या बॅंकेत पैसे भरले. आभासी चलनाबाबतचा संकेतस्थळावर महिलेने माहिती घेतली. आभासी चलनात गुंतवण्यात आलेली रकमेपोटी मिळणारा परताव्यासाठी तिने चौधरीकडे विचारणा केली. तेव्हा चौधरी आणि त्याचा साथीदार सेंगू यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिने सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. या प्रकरणी नुकताच येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख तपास करत आहेत.