विज्ञानविश्‍व: क्रायोस्फिअर आणि हवामान बदल

डॉ. मेघश्री दळवी
इंटरगव्हर्नमेंटल पॅनल फॉर क्‍लायमेट चेंज (आयपीसीसी) ही हवामान बदलावर काम करणारी एक अग्रगण्य संस्था. अलिकडे तिने महासागर आणि क्रायोस्फिअर यांच्यावर एक विशेष अहवाल प्रसिद्ध करून त्यांचा हवामान बदलाशी असलेला जवळचा संबंध उलगडून दाखवला आहे. क्रायोस्फिअर म्हणजे जगात जिथे जिथे पाणी गोठलेल्या (क्रायो) स्वरूपात आहे त्या सर्वांचा एकत्र विचार करण्यासाठी केलेला उल्लेख. त्यात हिमनग, हिमनद्या, उंच पर्वतांची बर्फाळ शिखरं, नद्या किंवा सरोवरावर तयार होणाऱ्या हिमलाद्या, ध्रुवप्रदेशात कायमचे आढळणारे बर्फाचे जाड थर (पर्माफ्रॉस्ट) अशा वेगवेगळ्या स्वरूपातल्या बर्फाचा समावेश होतो.

हायड्रोस्फिअरमध्ये केवळ द्रव स्वरूपातील पाण्याचा विचार केला जातो, आणि आपण सतत वापर करत असल्याने त्याचा हवामान बदलाशी लगेच संबंध जोडता येतो. मात्र क्रायोस्फिअर देखील विविध प्रकाराने आपल्या हवामानावर प्रभाव टाकत असतो आणि त्यासाठी हा खास अहवाल. गेली अनेक शतकं महासागर हे कार्बन सिंक म्हणून काम करत आहे. वातावरणातला कार्बन डायऑक्‍साइड शोषून त्याचं प्रमाण योग्य पातळीवर राखत आहे. पृथ्वीवर पाण्याचं प्रमाण 71 टक्‍के आहे आणि सूर्याच्या धगधगत्या उष्णतेला ते काही अंशी सुसह्य करत असतं. मात्र आता वातावरणात कार्बन डायऑक्‍साइडचं प्रमाण इतकं वाढत आहे, की महासागरांची नैसर्गिक क्षमता कमी पडू लागली आहे, असं या अहवालात सूचित केलं आहे. महासागरांना नद्या आणि पर्यायाने बर्फाचे साठे यांच्याकडून सतत पाणीपुरवठा होत असल्याने त्या दोघांचा एकत्र अभ्यास या अहवालात मांडला आहे.

ध्रुवप्रदेशातले बर्फाचे साठे सूर्यकिरणांना परावर्तित करून पृथ्वीचं तापमान थोडाफार कमी करत असतात. पण ते आता वेगाने वितळत चालले आहेत आणि पृथ्वीवरचं हे शुभ्र परावर्तक कवच झपाट्याने घटत चाललं आहे. उत्तर ध्रुवीय भागातला बर्फ वितळायला लागल्यावर तीन मोठे धोके उभे राहिले आहेत. एकीकडे या वितळलेल्या पाण्याने समुद्राची पातळी वाढण्याचं संकट भेडसावत आहे. जोडीने हा पिण्यायोग्य गोड्या पाण्याचा साठा वेगाने समुद्राला जाऊन मिळायला लागल्याने भविष्यात पिण्याचं पाणी कुठून आणायचं ही समस्या उभी ठाकत आहे. तर तिसरीकडे बर्फाच्या थराने सूर्यप्रकाशातल्या अवरक्‍त (इन्फ्रारेड) किरणांचं जे परावर्तन व्हायचं, ते कमी होऊ लागल्याने तापमानवाढ चक्रवाढीने वर जाते आहे. महासागरांमध्ये पाण्याचे प्रवाह वेगवेगळ्या दिशेने जात असतात आणि त्यांचा एकत्रित परिणाम ऋतू, जागतिक तापमान, पावसाचं प्रमाण आणि सागरी जीवांचं जीवनचक्र यांच्यावर होत असतो. त्यामुळे आज तेही बदलण्याची चिन्हं दिसत आहेत.

ज्या प्रमाणात उत्तर ध्रुवीय प्रदेशातले बर्फाचे साठे घटल्याच्या बातम्या येत आहेत, त्या तुलनेत अंटार्क्‍टिका अजून वितळायला लागली नाही. पण हा धोका दूर नाही असं या अहवालात स्पष्टपणे म्हटलं आहे. म्हणूनच तापमानवाढ रोखण्यासाठी कठोर उपाय योजण्याचं आवाहन आयपीसीसी सतत करत असते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)