‘साहेब माझं पोरग कुठंय…’ नदीकाठी आईच्या अश्रूंचा पूर…

मुठेच्या प्रवाहात मुले पडल्यानंतर पालकांचा हंबरडा

पुणे – “साहेब माझं पोरग कुठंय…”आहे इथेच, तुम्ही थोड शांत व्हा’ असे पोलिसांनी सांगताच, “कुठंय दाखवा मला, माझ्या पोराचं तोंड पहायचे…, असे विचारत त्या माऊलीने हंबरडा फोडला. कुणाला तरी बोलवा ना, माझ्या पोराला पाण्यातून बाहेर काढा… ओ ताई त्या फारवाल्यांना बोलवा ना… माऊलीच्या या विनवणीने पोलीस कर्मचाऱ्यांसह उपस्थितांची मनं हेलावली. या अवघडप्रसंगी प्रत्येकजण एकमेकाला धीर देत पोरं सापडतील, तू त्रास करून घेऊ नको. मात्र, त्या आईचे अश्रू थांबत नव्हते.

खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सध्या मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे. ताडीवाला रोड परिसरातील मुलं शुक्रवारी (दि. 16) सायंकाळी भिडे पुलाजवळ फोटोसेशन करत असताना तोल जाऊन दोन मुले पाण्यात पडली. त्यावेळी त्यांच्याबरोबर असलेल्या मित्रांनी त्यांना वाचविण्यासाठी आरडाओरडा सुरू केला. मात्र, पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे काही अंतरावरच मुले दिसेनाशी झाली. घाबरलेल्या मित्रांनी तत्काळ अग्निशमन, पोलीससह घरच्यांना माहिती दिली.

अग्निशमन आणि पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. वृद्धेश्‍वर-सिद्धेश्‍वर याठिकाणी जाळी लावण्यात आली. मात्र, उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही. आपले मुलं पाण्यात बुडाल्याची माहिती घरच्यांना कळताच आई-वडिलांसह ताडीवाला रोड परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले.

साहेब आमची पोरं कुठय, त्यांना काय झाले नाही ना? असे विचारताच, प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्या त्याच्या मित्राने “मावशी तो पाण्यात बुडाला’ असे म्हणताच त्या आईने हंबरडा फोडला. परिसरातील महिलांसह तरुणांनी मोठी गर्दी गेली. ताई, साहेब आमच्या पोरांना वाचवा, अशी विनवणी करत होते. तर, दुसरीकडे तरुणांची धावपळ सुरू होती. मुठेच्या काठावर हुंदक्‍यांचा आवाज येत होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.