मधुबनी (बिहार) – बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात एका 15 वर्षीय मुकबधीर मुलीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर आरोपींना तिने ओळखू नये म्हणून कठीण वस्तू खुपसत तिचे डोळे फोडण्यात आले. या क्रुर घटनेने संपूर्ण बिहार ढवळून निघाला आहे.
तिच्या दोन्ही डोळ्यांना गंभीर इजा झाली असून तिची दृष्टी पूर्णपणे गेली आहे का नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नाही, असे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. सध्या तिची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
हरलाखी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कौवाहा बारही गावात ही घटना घडली असून या प्रकरणात तीन जणांना अटक केली आहे, असे पोलिस अधिक्षक सत्य प्रकाश यांनी सांगितले. काही मुलांसोबत बकऱ्या चरण्यासाठी गावाबाहेरील रानात ही मुलगी गेली होती, त्यावेळी हा प्रकार घडल्याचे गावचे सरपंच राम इक्बाल मंडल यांनी सांगितले.
या मुलीसोबत असणाऱ्या एका मुलाने कुटुंबियांना या घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यावेळी रानात ही मुलगी बेशुध्दावस्थेत पडल्याचे आढळून आले. या मुलीला तातडीने नजिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला मधुबनी सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे ठाणे अंमलदार प्रेमलाल यांनी सांगितले.