पटणा – संपूर्ण देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. आरोग्यकर्मी व डॉक्टरांच्या अहोरात्र मेहनतीने या दुसऱ्या लाटेचा प्रभाव आता काहीसा ओसरु लागल्याचं चित्र आहे. मात्र, रुग्णांचा जीव वाचवणाऱ्या याच आरोग्य विभागाकडून काही ठिकाणी अक्षम्य निष्काळजीपणा होत असल्याच्या घटना देखील पुढे येत आहेत.
रुग्णाला तातडीने उपचारांची गरज असल्यास आधी उपचार व नंतर चाचण्या असे सूत्र डॉक्टर्स वापरतात. मात्र काही ठिकाणी रुग्णालय प्रशासन उपचारांपुर्वीच करोना टेस्टचा तगादा लावत असल्याने रुग्ण उपचारांपुर्वीच दगावत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
अशीच एक घटना बिहारमधील मुझफ्फरपूर येथे आरोग्य विभागाकडून झालेल्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे घडली आहे. मुझफ्फरपूरमधील रुग्णालयात संजय राम त्यांच्या आठ वर्षांच्या मुलीला उपचारांसाठी खांद्यावर घेऊन आले होते. त्यांच्या मुलीच्या गळ्यामध्ये लिची या फळाची बी अडकली असल्यामुळे त्यांनी रुग्णालय गाठले. मात्र यावेळी त्या मुलीची करोना टेस्ट करण्यात आली नसल्यामुळे रुग्णालयात तिला उपचार देण्यास तेथील आरोग्यविभागाने नकार दिला.
याच दरम्यान, त्यांच्या मुलीला उपचार न मिळाल्याने तिने वडिल्यांचा खांद्यावर तडफडत आपले प्राण सोडले. घटनास्थळी उपस्थित एका स्थानिक व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ काढला व यानंतर त्याने हा व्हिडियो सोशल मीडियावर शेअर करत आरोग्य विभागाच्या हलगर्जीचा प्रकार उघडीस आणला.
सध्या हा व्हिडियो सोशलवर चांगलाच व्हायरल झाला असून सर्व स्तरात संतापाची लाट उसळली आहे.
याबाबत, सिव्हिल सर्जन डॉ. एसएन चौधरी यांनी सांगितले की, या घटनेचा तपास करण्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीच्या तपास अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
दरम्यान, देशात गेल्या २४ तासात एक लाख ३४ हजार १५४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली तर दोन लाख ११ हजार ४९९ करोना रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे देशातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आता १७ लाख १३ हजार ४१३ वर पोहोचली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांचा आकडा आता दोन कोटी ६३ लाख ९० हजार ५८४ झाला आहे.