नवी दिल्ली – सध्या जागतिक क्रूड बाजारात उत्पादन मर्यादित आणि मागणीत वाढ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे क्रूडचे दर चढे आहेत. आगामी काळात ते आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे भारतातील तेल कंपन्यांना क्रूड आणि पेट्रोलच्या दरात वाढ करावी लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा क्रूड आयात करणारा देश आहे. भारत आपल्या गरजेच्या तब्बल 85 टक्के क्रूड आयात करतो. त्यामुळे जागतिक बाजाराचा थेट परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर होत असतो.
गेल्या महिन्यात क्रूडचे दर केवळ 72 डॉलर प्रति पिंप होते. ते आता 79 डॉलरवर गेले आहेत. त्यामुळे भारतातील तेल कंपन्यांनी आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. 24 सप्टेंबरपर्यंत तेल कंपन्यांनी दरवाढ टाळली होती. मात्र त्यानंतर हळूहळू इंधनाच्या दरात वाढ होऊ लागली आहे.
आगामी काळात परिस्थितीत फारसा फरक पडणार नसल्याचे तेल कंपन्यांना वाटते. तेल उत्पादक देशाची संघटना असलेली ओपीईसी तेल उत्पादन वाढविण्याबाबत काय निर्णय घेते याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. सध्या ही संघटना 40 लाख पींप प्रति दिन उत्पादन करीत आहे. गेल्या आठवड्यात पेट्रोलियम सचिव तरुण कपूर यांनी सांगितले की, तेल कंपन्यांना किमती ठरवण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.
सध्याच्या परिस्थितीचा विचार करून त्या योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. पुरवठा मर्यादित आणि मागणी जास्त या कारणांमुळे चीन आणि ब्रिटनसारख्या देशांमध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये इंधनाची टंचाई निर्माण झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र भारतीय तेल कंपन्यांनी सध्याची परिस्थिती अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळली आहे.
त्यामुळे इंधन महाग असले तरी पुरवठ्यावर फारसा परिणाम झालेला नाही असे त्यांनी सांगितले. जागतिक बाजारात दरम्यानच्या काळात स्वयंपाकाच्या गॅसचे दर जवळजवळ दीड पटीने वाढले आहेत. मात्र भारतामध्ये त्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली नाही. एकूण इंधन आघाडीवर जागतिक पातळीवर नकारात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये सर्वच क्षेत्रात महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे समजले जाऊ लागले आहे.