नवी दिल्ली – तेल उत्पादक देशांनी जागतिक मागणी कमी असूनही तेलाचा पुरवठा आणखी कमी केला आहे. त्यामुळे जागतिक बाजारात तेलाचे दर पुन्हा वाढत आहेत. सध्या कच्च्या तेलाचे दर 87 डॉलर प्रति पिंप या पातळीवर गेले आहेत.
2014 नंतर प्रथमच कच्च्या तेलाचे दर इतके वाढले आहेत. मात्र तरीही 74 दिवसापासून तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलेली नाही. उत्तर प्रदेश, पंजाब आणि इतर राज्यात होत असलेल्या निवडणुकांमुळे ही दरवाढ केली नसल्याचे समजले जात आहे.
मात्र निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. अरब अमिरातीमध्ये हैतीच्या काही दहशतवादी गटानी हल्ला केल्यानंतर या आठवड्यात कच्च्या तेलाच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.
त्यामुळे सौदी अरेबिया आणि ईराण दरम्यानचा संघर्ष आणखी वाढू शकतो. जर हा संघर्ष वाढला तर मात्र जागतिक तेल पुरवठ्यावर प्रचंड परिणाम होऊ शकतो. याअगोदरही निवडणुकीच्या वेळेस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवण्याच्या घटना घडल्या आहेत. कर्नाटक निवडणुकीवेळी मे 2018 मध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर 19 दिवस स्थिर ठेवण्यात आले होते. मात्र निवडणुका संपल्यानंतर सलग 16 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती.
डिसेंबर 2017 मध्ये गुजरात विधानसभेच्या निवडणुकीवेळी 14 दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात फारशी वाढ करण्यात आली नव्हती. मात्र लोकसभेच्या निवडणुकीचा शेवटचा टप्पा झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये दीर्घकाळ वाढ करण्यात आली होती.
अनेकदा कच्च्या तेलाच्या किमती कमी असताना केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात उत्पादन शुल्क वाढवून वाढ केली होती. यावर अनेक वेळा टीका होऊनही महसुलातील तूट भरून काढण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करणे गरजेचे असल्याचे अर्थ मंत्रालयाने सांगितले होते.