वैयक्तिक आकसातून बॉम्ब हल्ला झाल्याचा पोलिसांचा दावा
लखनौ : लखनौमधील न्यायालयाच्या आवारात आज एका क्रूड बॉम्बचा स्फोट झाला. त्यामध्ये तीन वकील जखमी झाले. या क्रूड बॉम्बचा स्फोट दोन गटातील वर्चस्वासाठीच्या संघर्षातून झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. न्यायालयाच्या आवारात 2 जिवंत बॉम्बही आढळून आले आहेत. हा स्फोट आपल्या चेंबरच्या बाहेरच झाला असल्याचा दावा वकिलांनी केला होता.
मात्र बॉम्बस्फोटांचा आवाज कोणीही ऐकला नाही किंवा कोणीही स्फोट बघितलेही नाहीत, असे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी या घटनेच्या तपासाला सुरुवात केली असून बॉम्ब शोधक-नाशक पथकासह पोलिसांचा मोठा फौजफाटा न्यायालयाच्या आवारामध्ये जमा झाला होता. काही न्यायालयीन अधिकाऱ्यांविरोधात तक्रार केल्यामुळे या बॉम्बद्वारे आपल्याला लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा दावा लखनौ बार असोसिएशनचे सहसचिव संजीव कुमार लोधी यांनी म्हटले आहे.
सकाळी 11.30 वाजता 10 जणांनी आपल्या चेंबरच्या बाहेर क्रूड बॉम्ब फेकले. त्यामध्ये आपल्यासह अन्य दोन वकील जखमी झाल्याचेही लोधी यांनी म्हटले आहे. एका बॉम्बचा स्फोट झाला. तर अन्य दोन बॉम्बचा स्फोट झाला नाही. हातातील बंदुका दाखवत हल्लेखोर पळून गेल्याचेही त्यांनी सांगितले. न्यायालयीन आवाराच्या सुरक्षिततेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.