सीआरपीएफच्या कोब्रा पथकात ‘महिला राज’ ;पथकात प्रथमच 34 महिलांचा समावेश

नवी दिल्ली – केंद्रीय राखीव पोलीस दलाने त्यांच्या प्रतिष्ठित अशा कमांडो बटालियन फॉर रेझ्युल्यूट ऍक्‍शन (कोब्रा) या पथकात प्रथमच 34 महिलांचा समावेश करण्यात आला आहे. हे पथक मुख्यत: नक्षलग्रस्त भागात तैनात केले जाते.

कोब्रा पथकात दलाच्या 35व्या रायझिंग दिनी समावेश करण्यात आला. त्यावेळी 88वी महिला बटालीयन बनवण्यात आली. अशा स्वरूपाची जगातील ही पहिलीच महिला बटालीयन आहे. महिला सक्षमीकरणाचे ठाम पाऊल असल्याचे दलाच्या निवेदनात म्हटले आहे.

या पथकात समावेश करण्यापूर्वी या महिला केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कठोर कोब्रा प्रशिक्षणातून बाहेर पडल्या आहेत. त्यात त्यांना गोळीबाराच्या पुढील टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या शिवाय विशेष शस्त्रे, सामरिक आखणी, स्फोटके आणि जंगलात जिवंत राहण्याची कौशल्ये शिकवण्यात आली.

त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना नक्षलग्रस्त भागात तैनात करण्यात येणार आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलातील महिलांचे बॅंड पथकही तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी महिलांना वाद्य वादनाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

महिला योध्यांना बळ देऊन दलाने इतिहास घडवला आहे. या शूर महिलांनी दलाची मान उंचावली आहे. देश परदेशातील कामगिरी बजावत त्यांनी देशाचे नाव उंचावले आहे. महिला सक्षमीकरणामुळे कौटुंबिक सक्षमीकरण होते. त्यातून पर्यायाने देशाला बळ मिळते.
– ए. पी. माहेश्‍वरी, महासंचालक सीआरपीएफ

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.