24 तासात दुसरी घटना तर गोळीबारात घटनेत दोघांचा मृत्यू
नवी दिल्ली : विधानसभेची निवडणूक सुरू असलेल्या झारखंडमध्ये नियुक्तीवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) एका कॉन्स्टेबलने सोमवारी रात्री उशीरा आपल्या वरिष्ठांवर गोळीबार केला. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. गोळीबारात आणखी एक जण जखमी झाला. बोकारोमध्ये ही घटना घडली.
सीआरपीएफच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी गोळीबार करणाऱ्या जवानाने मद्यपान केले होते. त्याने केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे सहायक कमांडंट आणि सहायक उपनिरीक्षक हे दोन्ही मृत पावले. सोमवारी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली. त्या जवानाने नेमक्या कोणत्या कारणामुळे गोळीबार केला हे अद्याप समजलेले नाही. या घटनेनंतर सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.
या प्रकरणी अंतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचे आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले. सोमवारीच अशीच एक घटना रांचीमध्ये घडली होती. छत्तीसगढ सशस्त्र दलाच्या एका कॉन्स्टेबलने आपल्या कंपनी कमांडंटवर गोळीबार करून त्यांना ठार मारले. त्यानंतर त्याने स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केली.