इंफाळ : रविवारी सकाळी मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यातील मोंगबुंग गावात संशयित दहशतवाद्यांनी केलेल्या बंदुकीच्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) एक जवान शहीद झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.या गोळीबारात एक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अजय कुमार झा (४३) असे शहीद जवानाचे नाव असून तो बिहारचा रहिवासी आहे. त्याच्या डोक्यात गोळी लागल्याने त्याला रुग्णालयात आणले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर उपचार सुरू आहेत. मात्र तो धोक्याबाहेर असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. एका पोस्टमध्ये, मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी हल्ल्याचा निषेध केला आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. हा हल्ला कुकी गटाने केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
या हल्ल्यानंतर शेजारील डोंगरी भागातून मोंगबुंग येथे अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे, असे अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले. या हल्ल्यात सुरक्षा जवानांच्या वाहनाचे नुकसान झाले आहे.