इंफाळ : मणिपूरमध्ये गुरूवारी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानाने धक्कादायक कृत्य केले. त्या जवानाने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 2 सहकारी मृत्युमुखी पडले. तर, आणखी 8 जण जखमी झाले. सहकाऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या जवानाने नंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. ती घटना इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील सीआरपीएफच्या छावणीत रात्री 8.20वाजण्याच्या सुमारास घडली.
सीआरपीएफचा हवालदार संजय कुमार याने अचानकपणे सहकाऱ्यांवर बेछूट गोळीबार केला. त्या गोळीबारात उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल असे दोघे जागीच मृत्युमुखी पडले. स्वत:वर गेलेल्या गोळीबारात कुमारही मृत्युमुखी पडला. सीआरपीएफच्या इतर जखमी जवानांना उपचारासाठी तातडीने इंफाळमधील रूग्णालयात हलवण्यात आले.
कुमारने नेमक्या कुठल्या कारणावरून सहकाऱ्यांवर गोळीबार केला ते लगेचच समजू शकले नाही. मात्र, कुठल्याशा कारणावरून सहकाऱ्यांशी वाद झाल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. संबंधित घटनेच्या चौकशीचे आदेश सीआरपीएफच्या वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले. स्थानिक पोलिसांनीही स्वतंत्र तपास सुरू केला आहे.