श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील पुलवमा जिल्ह्यात झालेल्या “आयईडी’च्या कमी क्षमतेच्या स्फोटामध्ये सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला. दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील गोंगू इथे आज सकाळी सुरक्षा रक्षक जात असताना ही घटना घडली. सीआरपीएफच्या ताफ्याला लक्ष्य करण्यासाठी दहशतवाद्यांनी “आयईडी’ पेरून ठेवले होते.
या स्फोटात एका जवानाच्या हाताला दुखापत झाली असून त्याला युनिट एमआय इथे हलवण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. स्फोट झाल्यावर सुरक्षा रक्षकांनी परिसराची नाकाबंदी केली आणि बंदुकीच्या काही फैरी हवेमध्ये झाडल्या. या परिसराची कसून तपासणी करायला सुरुवात करण्यात आली आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
मे महिन्यात सुरक्षा रक्षकांनी स्फोटकांनी भरलेली एक कार पकडली होती. गेल्या वर्षी झालेल्या पुलवामा हल्ल्यासारखाच स्फोट घडवून सुरक्षा रक्षकांना लक्ष्य करण्याचा दहशतवाद्यांचा कट यामुळे उघडकीस आला होता. ही कारमध्ये 40 ते 45 किलो स्फोटके होती. ही कार आणि स्फोटके नंतर बॉम्ब नाशक पथकाने नष्ट केली होती, असे जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी सांगितले.
पुलवामा जिल्ह्यातच आज आणखी एक “आयईडी’ स्फोटक सुरक्षा रक्षकांनी शोधून काढले आणि नष्ट केले, असेही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.