नवी दिल्ली: केंद्रीय राखीव पोलीस दलातील दोघा कर्मचाऱ्यांना करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे “सीआरपीएफ’चे मुख्यालय सील करण्यात आले आहे. एका अधिकाऱ्याचे वैयक्तिक सहायक आणि एक बसचालकाला करोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. या दोघांच्या प्राथमिक तपासणीमध्ये ही बाब स्पष्ट झाली, असे अधिकाऱ्यांनी आज सांगितले.
लोधी रोडवरील केंद्र शासकीय कार्यालय संकुलामध्ये पाच मजली इमारतीत “सीआरपीएफ’चे मुख्यालय आहे. “सीआरपीएफ’चे विशेष महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या वैयक्तिक सचिवाला करोनाची लागण झाल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. त्याशिवाय मुख्यालयातच कार्यरत असलेल्या एका बसचालकालाही संसर्ग झाला आहे. त्यामुळे या संपूर्ण कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे, असे “सीआरपीएफ’च्या प्रवक्त्याने सांगितले.
मुख्यालयाच्या इमारतीमध्ये सर्व अधिकाऱ्यांचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. वैद्यकीय मार्गदर्शक सूचनांनुसार संपूर्ण इमारत सील करण्याची सूचना सीआरपीएफचे महासंचालक ए. पी. माहेश्वरी यांनी दिल्या आहेत.
करोनाची लागण ज्यांच्या स्वीय सहायकाला झाली आहे, त्या एसडीजी श्रेणीच्या अधिकाऱ्याने स्वतःला क्वारंटाईन केले आहे. सीआरपीएफमधील किमान 135 कर्मचाऱ्यांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. तर 55 वर्षीय उपनिरीक्षकाचा गेल्या आठवड्यात करोनामुळे मृत्यू झाला आहे.