करोनाचे नाही भय ना भीती; पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप
रांजणगाव गणपती (प्रतिनिधी ) : कारेगाव तालुका शिरूर येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेमध्ये एका संस्थेच्या माध्यमातून आज गरजवंतांना मोफत आवश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. मात्र संस्थेच्या व शाळेच्या नियोजन शून्य कारभारामुळे या ठिकाणी एकच झुंबड उडाली होती. कारेगाव (तालुका शिरूर) येथे आजपर्यंत ६५ कोरोना बाधित रुग्ण सापडले असून याठिकाणी जमा झालेली गर्दी किती कोरोना पेशंट वाढवते, याबाबत ग्रामस्थांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
गेले महिनाभर कारेगाव हे कोरोना बाधित पेशंटची संख्या कमी होण्यासाठी बंद ठेवण्यात आले होते. मात्र एका सामाजिक संस्थेच्या व शाळेच्या ढिसाळ कारभारामुळे आज कारेगाव येथे प्राथमिक शाळेत एकच झुंबड उडाली होती. अन्नधान्याच्या आवश्यक वस्तूच्या वाटपासाठी मँजिक बस नावाच्या एका सामाजिक संस्थेला प्राथमिक शाळेच्या शिक्षकांना व शाळा व्यवस्थापन समितीला प्रशासनाने कोरोना वाढवण्याची वाट मोकळी करून दिली का काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिक छोट्या-मोठ्या व्यवसायिकांनी, ग्रामस्थांनी घरात बसायचे. मात्र सामाजिक संस्थांनी व कंपन्यांनी व प्रशासनाने गर्दी करुन कोरोना वाढवायचा. हाच प्रकार आज कारेगाव मध्ये निदर्शनास आला असून रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन या आयोजकांवर कारवाई करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याठिकाणी गरजवंत वस्तू घेऊन जाण्यासाठी गर्दी जमा झाली होती. नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा दुतर्फा व शाळेमध्ये एकच गर्दी केली होती.
ही गर्दी पांगवण्यासाठी अक्षरशः पोलिसांना या ठिकाणी हजर व्हावे लागले होते. जर या गर्दीतून कोरोना वाढला तर त्याला जबाबदार कोण? प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, प्राथमिक शाळेची शिक्षण समिती की आयोजन करणारी मँजिक बस ही संस्था. आता यावर प्रशासन काय कारवाई करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
या बाबत याबाबत आयोजन केलेल्या मॅजिक बस या कंपनीच्या सामाजिक संस्थेच्या वतीने आम्ही तहसिलदारांची परवानगी घेऊन वस्तूचे वाटप केले असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र संबंधित कामगार तलाठी यांच्यांशी संपर्क साधला असता माझी कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे कामगार तलाठ्यांनी सांगितले.
या बाबत प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याशी संर्पक साधला असता तहसिलदारांना या सर्व प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले.