कराडमध्ये दहशत माजवणाऱ्यांवर जमावाची दगडफेक

दुचाकी जाळली; वाहनांच्या काचा फोडल्या; टोळ्यांमधील वर्चस्ववाद
कराड (प्रतिनिधी) – रेकॉर्डवरील गुन्हेगार जुनेद शेखचा भाऊ अमीर व त्याच्या पाच ते सहा साथीदारांनी बुधवार पेठ परिसरात पिस्तूल दाखवून दहशत माजवली. प्रभात टॉकीज परिसरात शनिवारी (दि. 15) रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी तेथील युवक व अमीर शेख यांची बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही गटांतील युवकांनी दगडफेक केली. जमावाने रस्त्यावरील दुचाकी जाळली. आग आटोक्‍यात आणण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीवरही दगडफेक करण्यात आली. या घटनेने शहरात तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत.

गणेश दादासाहबे वायदंडे (रा. बुधवार पेठ, कराड) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अमीर फारुख शेख (वय 32, रा. शिवाजी चौक, मलकापूर), तुषार वसंत यादव (वय 27 रा. काले, ता. कराड) व अन्य चार अनोळखी साथीदारांनी दुचाकीवरून प्रभात सिनेमागृहाजवळ येऊन लोकांना दमदाटी केली. आम्ही इथले दादा आहोत, अमीरचे वर्चस्व राहणार. तुम्ही येथे थांबायचे नाही, अशी धमकी देऊन एकाने पिस्तूल दाखवले. जुनेद बाहेर आल्यावर तुम्हाला दाखवतो, अशी दमदाटी केली.

अमीर शेखने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास प्रभात सिनेमागृहाजवळच्या पानपट्टीतून तंबाखूची पुडी घेऊन मंडईकडे जात असताना समोरून आलेल्या एकाने शिवीगाळ करत, तू इकडे काय करतोस, असे विचारले. यावेळी मी पुढे जात असताना समोरून आलेल्या तीन ते चार जणांनी दगडफेक केली. त्यामध्ये एक दगड माझ्या डोक्‍याला तर दुसरा दगड तुषार यादवला लागला. संतप्त जमावाने दुचाकी पेटवली. अग्निशमन दलाच्या गाडीवरही जमावाने दगडफेक केली.

दरम्यान, या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस बंदोबस्त तैनात केला. अमीर व तुषार यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. अमीरच्या फिर्यादीवरून बुधवार पेठेतील काही युवकांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.