कार्ला – कार्ला येथे बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत जनधन योजनेसाठी सोमवारी (दि. 29) महिलांनी मोठी गर्दी केली होती. जनधन योजनेंतर्गत पुढील तीन महिन्यांसाठी प्रत्येक महिन्याला खातेदारांच्या खात्यात पाचशे रुपये जमा होणार या अफवेने कार्ला येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत महिलांनी खाते उघडण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
सकाळपासून वेहेरगाव, दहीवली, शिळाटणे, कार्ला आदी परिसरातील चारशे ते पाचशे महिलांनी महाराष्ट्र बॅंकेसमोर खाते उघडण्यासाठी गर्दी केली होती. बॅंक ऑफ महाराष्ट्र कार्ला शाखाधिकारी साईश पाटील यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी केंद्र शासनाचा जनधन योजनेंतर्गत जी आर ऑनलाइन बघितला पण शासनाने असा कुठलाही जी आर काढला नाही किंवा तशी नवीन घोषणा केली नाही.
मागील तीन महिन्यात लॉकडाऊन काळात ज्यांचे जनधन खाते होते त्यांच्या खात्यात पाचशे रुपये जमा झाले आहेत, असे शाखाधिकारी पाटील यांनी सांगितले. शाखाधिकारी पाटील यांनी जनधन खाते उघडण्यासाठी आलेल्या महिलांना वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने दुपारी तीन वाजता त्यांनी जनधन योजनेचे अर्ज देण्याची प्रक्रिया थांबवली. महिलांमध्ये अफवा पसरल्याने महिलांची मोठी गर्दी झाली होती.