पुण्यातील दुकानांबाहेर खरेदीसाठी नागरिकांची झुंबड !

सोशल डिस्टंसिंगचा फज्जा : लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याची भीती

पुणे :  वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर येत्या सोमवारी (13 जुलै) मध्यरात्रीपासून 10 दिवसांसाठी जिल्हा प्रशासनाने पुन्हा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे शनिवारी सकाळपासून मार्केट यार्डातील गुळ-भुसार बाजार, शहरातील विविध भागातील मॉल, किराणा आणि फरसाण्याच्या दुकानात खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले.

सदाशिव पेठेतील घाऊक औषध विक्रेते, रविवार पेठेतील बाजारात जीवनावश्‍यक वस्तुंची खरेदी नागरिकांनी केली. आता पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनची कडक अंमलबजाणी करण्यात येणार आहे. किराणा दुकाने, भाजीपाला विक्री बंद राहणार आहे. केवळ दुध आणि औषधांची विक्री होणारआहे. सध्या दहा दिवस लॉकडाऊनचा कालावधी असला तरीही त्यामध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भीतीपोटी नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडले आहेत.

शहरातील मोठमोठ्या मॉलमध्ये ठराविक संख्येने नागरिकांना खरेदीसाठी सोडण्यात येत आहे. ठराविक लोक खरेदी करून आल्यानंतर इतरांना सोडण्यात येत आहे. त्यामुळे मॉलसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.  स्वीट होम, फरसाण दुकानात नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी दिसून आले. मार्केट यार्डात भुसार विभागातही सकाळपासून गर्दी दिसून आली.

मात्र, तेथे किराणा दुकानदार आणि विक्रेत्यांपेक्षा किरकोळ अन्नधान्य आणि खरेदीसाठी आलेल्यांची संख्याच लक्षणीय होती. तसेच गर्दीमुळे वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.