साताऱ्यात बाप्पांच्या दर्शनासाठी गर्दी

देखाव्यांवरील खर्चाला पूरपरिस्थितीमुळे बगल

सातारा – विघ्नहर्त्या गणरायाच्या दर्शनासाठी सातारकर सोमवारपासून पावसाच्या उघडीपीने बाहेर पडू लागले आहेत. सायंकाळी सातनंतर शाहूनगरीतील रस्त्यारस्त्यांवर भाविक मोठ्या संख्येने आले. “मोरया… मोरया…’च्या जयघोषामुळे वातावरण गणेशमय झाले. महापुराच्या कटू स्मृती बाजूला ठेवत मांगल्य उत्सवाचा आनंद घेतला जात आहे. साताऱ्यात आकर्षक देखावे टाळून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यावर सर्वच मंडळांनी भर दिला आहे.

त्यामुळे देखाव्यांपेक्षा भव्य व रेखीव गणेशमूर्ती हेच यंदाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले आहे. मात्र फारशी सजावट न करणाऱ्या साताऱ्यातील मंडळांनी ती मदत सांगली व कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना पाठवून दिली. सोमवारपासून पावसाने उघडीप घेतल्याने सातारकर गणरायाच्या दर्शनासाठी बाहेर पडत आहेत. गुरुवारी अनंत चतुर्दशी व बुधवारी 120 पैकी निम्म्या मंडळाचे विसर्जन यामुळे गणेश भक्तांनी गणराय दर्शनाचे औचित्य साधले. साताऱ्यातील गणेशोत्सवाला उधाण आले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पावसाच्या हलक्‍या सरी पडल्या. परंतु, त्याचा परिणाम गणेशभक्तांवर झाला नाही. रात्री उशिरापर्यंत भाविक देखावे पाहण्यात गुंग होते.

गौरी आणि घरगुती गणपतींचे विसर्जन झाले. मंगळवारच्या मोहरमसुटीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि देखावे पाहण्यासाठी संध्याकाळी सातारकर घराबाहेर पडले. दुपारनंतर मोती चौक शनिवार पेठ, फुटका तलाव, खण आळी, प्रतापगंज पेठ पोवई नाका येथे गणराय दर्शनासाठी गर्दी वाढू लागली. गणेशोत्सवाला सुरवात झाल्यानंतर पहिले दोन ते तीन दिवस संध्याकाळी पाऊस हजेरी लावत होता. त्यामुळे सातारकर देखावे पाहण्यासाठी बाहेर पडू शकत नव्हते. रविवारी सकाळीही पावसाने हजेरी लावली. पण, दुपारनंतर विश्रांती घेतली. त्यामुळे शहर आणि परिसरातून नागरिक देखावे पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली. शहरातील मध्यवर्ती भागात गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या जात आहेत. गणेश भक्तांची गर्दी पाहून कार्यकर्ते वाहतूक पोलिसांना मदत करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.