पुण्यात दिवाळीनिमित्त गर्दीचे ‘फटाके’…

करोनाची भीती बाजूला सारत रस्ते फुलले

पुणे – एकीकडे करोना प्रादुर्भाव, आर्थिक मंदी, बेरोजगारी अशा विविध विषयांवर चर्चा घडत असताना, पुण्यातील रस्त्यांवर मात्र रविवारी उलट चित्र अनुभवायला मिळाले. दिवाळी खरेदीसाठी नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता.

तब्बल सहा ते सात महिन्यांनंतर पुण्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे समाधानकारक चित्र दिसायला सुरूवात झाली होती. मात्र केरळ आणि कर्नाटक राज्यांत सणानंतर उद्भवलेल्या प्रादूर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी आवश्‍यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे वारंवार केले जात आहे.

परंतु रविवारी बाजारपेठांमधील गर्दी पाहता, पुणेकरांना करोनाच्या प्रादुर्भावाचा विसर पडला की काय, असा सवाल उपस्थित होत होता. दरम्यान, दिवाळसणासाठी कपडे, पणत्या, आकाशकंदील, सुशोभनाचे साहित्य, होम अप्लायन्सेस, मिठाई आदी पदार्थ घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.

मास्कचाही वापर नाहीच
“करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्कचा वापरा’ असे वारंवार सांगण्यात येत आहे. मास्क न वापरणाऱ्या सुमारे दीड लाख पुणेकरांना तब्बल 7 कोटी 60 लाख रुपयांचा दंड आकारला होता. मात्र अद्यापही पुणेकरांकडून मास्क वापरण्याला “हलक्‍यातच’ घेत आहेत. रविवारी खरेदीसाठी आलेल्या अनेक नागरिकांनी मास्कचा लावलेला नव्हता, तर काहींचा मास्क गळ्यात अडकवलेला असल्याचे चित्र होते.

पार्किंगही हाऊसफुल्ल
सध्या करोनाच्या धर्तीवर अनेक जण खरेदी करण्यासाठी स्वत:चे वाहन वापरण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे मंडई परिसरातील पार्किंग, शनिपार परिसरातील पार्किंग देखील हाऊसफुल्ल झाले होते. मात्र पार्किंगसाठी रस्त्यावर “वेटिंग’वर उभ्या असणाऱ्या नागरिकांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत होती. याशिवाय अनेकांनी शनिवारवाड्याजवळ आणि नदीपात्रात वाहने उभी केली होती.

वाहतूक संथ
ग्राहकांच्या गर्दीमुळे रविवारी दिवसभर या भागातील वाहतूक संथ गतीने सुरू होती. बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्त्याकडून, मंडईकडून ये-जा करणाऱ्या दुचाकी, चारचाकी आणि बसेसमुळे या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. परंतु, अपुरा रस्ता आणि पादचाऱ्यांमुळे वाहतूक संथ सुरू होती. त्यामुळे विश्रामबाग वाड्याजवळील चौकात एकत्र येणाऱ्या सर्व रस्त्यांना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

…अन्‌ लक्ष्मी रस्त्याची “फिनिक्‍स झेप’
करोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून आलेली मरगळ रविवारी दिसलीच नाही. लक्ष्मी रस्त्याने आणि पर्यायाने पुणेकरांनी फिनिक्‍स पक्षाप्रमाणे झेप घेतली. करोनाची कोणतीही भीती बाळगू न देता मनसोक्त खरेदी केली.

त्यामुळे व्यावसायिकही खुशीत दिसले. बऱ्याच महिन्यांनी करोनाचे सावट दूर झाल्यासारखी परिस्थिती दिसली. परंतु, हे करत असतानाच अनेक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जाही उडाल्याचे चित्र दिसले. लक्ष्मी रस्त्यावर रविवारी विक्रमी संख्येने नागरिक दिसले असून गेल्या सात-आठ महिन्यातील हा उच्चांक होता. अबाल-वृद्धांच्या चेहऱ्यावर करोनाच्या दहशतीचा किंवा भीतीचा लवलेशही दिसत नव्हता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.