रेल्वे स्थानकावरील गर्दी ठरणार ‘सुपर स्प्रेडर’?

बाधितांची संख्या वाढण्याचा धोका

पुणे – शहरातील वाढती रुग्णसंख्या, त्या पार्श्‍वभूमीवर लादण्यात आलेले निर्बंध, खानावळी आणि रोजगार बंद असल्याने होणारी गैरसोय आणि अनिश्‍चिततेचे सावट अशा सगळ्या परिस्थितीत बाहेरगावातून पुण्यात आलेले नागरिक आपल्या गावी परतण्यासाठी धडपड करत आहेत. यामुळे रेल्वेस्थानक परिसरात प्रचंड गर्दी होत आहे. मात्र, याठिकाणी सुरक्षिततेबाबत कोणत्याही उपाययोजना नसल्याने रेल्वे स्थानकावरील गर्दी ही करोनाची “सुपर स्प्रेडर’ ठरेल की काय, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

पुणे रेल्वे स्थानकावर गेल्या काही दिवसापासून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने केवळ कन्फर्म तिकीट असणाऱ्यांनाच प्रवास करण्याची परवानगी असेल, असे सांगितले जात असतानाही, प्रतीक्षा यादीत असलेले, तिकीट नसलेले असे अनेक प्रवासी “काही तरी व्यवस्था होईल’, या आशेने रेल्वे स्थानकावर गर्दी करत आहे.

अशातच याठिकाणी सुरक्षिततेचे नियम पायदळी तुडविले जात असून, मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर राखणे असे कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे.

गर्दीचे प्रमाण प्रचंड असल्याने, पुरेशा मनुष्यबळाअभावी गर्दीचे नियंत्रण करण्यास रेल्वे प्रशासनाकडून हतबलता दर्शविण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.