पवनानगर, (वार्ताहर) – मागील काही वर्षांपासून पवना धरण आणि परिसराला पर्यटकांची पसंती मिळत आहे. पवन मावळ हे राज्यभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. प्रत्येक विकेंडला पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची मोठी गर्दी पवन मावळ परिसरात होताना दिसत आहे.
मावळ तालुक्यातील बारमाही पर्यटनस्थळ असलेले लोणावळा, खंडाळा यांच्यासोबतच पवनमावळ परिसर आता पर्यटकांना खुणावू लागला आहे.
पवना धरण, लोहगड किल्ला, किल्ले विसापूर, तुंग, तिकोणा हे गड, तसेच प्रतिपंढरपूरसह विविध धार्मिक ठिकाणे, बेडसे लेणी, धरणाजवळील कॅम्पिंग यांसोबत कृषी पर्यटन यामुळे प्रत्येक विकेंडला पर्यटकांची पाऊले अपोआप पवनमावळाकडे वळतात.
पर्यटकांना आवडे आंबेगावचा डोंगर –
पवना धरण येथून किल्ले लोहगडाकडे जाताना मार्गावर आंबेगाव या गावाजवळील डोंगरावर असणारे लहान-मोठे धबधबे पर्यटकांना मोहीत करतात.
कुटुंबालीसोबत मौजमस्ती करण्यासाठी आणि पावसाळी पर्यटनासाठी हे ठिकाणी सुरक्षित आणि सोइस्कर आहे. या डोंगरावरील रस्त्यालगतचे लहान मोठे धबधब्यांमुळे पर्यटकांची मोठी गर्दी येथे होते. मात्र पर्यटकांकडून रस्त्यावर वाहने पार्क केली जात असल्याने त्याचा त्रास स्थानिक आणि इतर वाहनचालकांना होतो.