सुट्यांमुळे भीमाशंकरला भाविकांची गर्दी

शनिवार, रविवारीही अनेकांनी लुटला वर्षा पर्यटनाचा आनंद 

भीमाशंकर – श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दुसऱ्या श्रावणी सोमवारी सरकारी सुट्टी व सोम प्रदोष असल्याने मोठी गर्दी झाली होती. गर्दीमुळे दर्शनरांग बसस्थानकापर्यंत जाऊन पोहचली. अशीच गर्दी शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी पाहायला मिळाली.

हा आठवडा सुट्ट्यांचा असल्याने दररोज भीमाशंकरमध्ये गर्दी होण्याची शक्‍यता आहे. भीमाशंकरमधील पाऊस देखील कमी झाला असून, अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत व धुक्‍याने संपूर्ण परिसर वेढलेला आहे. या दुसऱ्या श्रावणी सोमवारी पुणे, मुंबई, नगर, नाशिक कडील लोक मोठ्या संख्येने दिसले. त्यात वाडा मार्गे भीमाशंकरचा रस्ता अजूनही सुरू झाला नसल्याने सर्व वाहतूक मंचर-घोडेगाव-भीमाशंकर मार्गे सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावर प्रचंड गर्दी पहावयास मिळाली.

भीमाशंकरकडे येताना पोखरी घाटातून डिंभे धरणाचे विहंगम दृष्य दिसत असल्याने येथेही मोठ्या संख्येने पर्यटक थांबत आहेत. पोखरी घाटातील धबधब्यावर भिजण्याचा मनसोक्त आनंद पर्यटक घेतात. तर काही पर्यटक रस्त्याने आदिवासी लोक भात खाचरांमध्ये भात आवणी करत असताना थांबून भात लावण्याच्या कामात सहभागी होतात व फोटो काढण्याचा
आनंद घेतात.

या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चार वाहनतळांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच मंदिरातही भीमाशंकर देवस्थानच्या सुरक्षारक्षकांनी दर्शन लवकर व्हावे यासाठी नियोजनबद्ध व्यवस्था केली होती.

विजेच्या लपंडावाने व्यापारी त्रस्त
मागील एक आठवड्यापासून भीमाशंकरमध्ये विजेचा लपंडाव सुरू असल्याने येथील व्यापारी व नागरिक त्रासले आहेत. अनेकवेळा महावितरणचे शाखा अभियंतांना सांगूनही दखल घेत नाही. भीमाशंकरमध्ये यात्रेसाठी हजारो भाविक रोज येत आहेत. तसेच येथे सतत धुके पसरलेले असते त्यामुळे विजेची नितांत आवश्‍यकता आहे. यात्रा नियोजन बैठकीत अधिकाऱ्यांच्या सर्व सांगूनही ते प्रत्यक्षात कोणतेही काम करत नाहीत, अशी तक्रार भीमाशंकर देवस्थानचे विश्‍वस्त दत्तात्रय कौदरे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.