खडकवासला – करोनाचे निर्बंध पूर्णपणे उठविण्यात आल्यानंतर विकेंडला खडकवासला धरण चौपाटीवर पुन्हा मोठी गर्दी जमू लागली आहे. गुढीपाडवा साजरा झाल्यानंतर दुपारनंतर शनिवारी व रविवारी अशीच वर्दळ येथे वाढू लागली. अशा गर्दीमुळे शनिवार, रविवार वाहतूक कोंडीची समस्या कायम राहिली
खडकवासला धरण चौक तसेच चौपाटी रस्त्यालगत असलेल्या खाद्य दुकानांसमोर वाहने उभी केली जात असल्याने कोंडी होत आहे. खडकवासला, सिंहगड, पानशेत या ठिकाणी हजारो पर्यटक या रस्त्याने ये-जा करत असतात. मात्र प्रवाशांना पानशेतकडे तसेच पुण्याकडे जाताना संध्याकाळी मोठी कसरत करावी लागत आहे. खडकवासला धरण चौपाटीवर रस्त्यालगत चारचाकी व दुचाकी वाहने तासंतास उभी ठेवली जातात.
या वाहनांच्या रांगा रस्त्यांच्या मध्यापर्यंत येत असल्याचे चित्र शनिवार, रविवार पाहिला मिळते. त्यातच सेल्फी काढणाऱ्यांचाही वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी खडकवासला धरण चौकापासून धरण चौपाटी रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाई करून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.