‘फिनिश लाइन क्रॉस’ करीत तिरंगा फडकविला…; दुबईतील स्पर्धेत ‘ती’ ठरली ‘आयर्न मॅन’

हडपसर -स्मिता ही 30 मिनिटं तुझ्या आयुष्यात परत कधीच येणार नाहीत, असं ते ओरडून पती सांगत होते आणि त्याच्यानंतर मी धावतच सुटले, त्यांनी हातात आपल्या देशाचा तिरंगा ध्वज दिला आणि डोळ्यासमोर खुणावणारी फिनिश लाइन दिसली. प्रचंड वेगात फिनिश लाइन क्रॉस करीत तिरंगा फडकविला…, अभिमान वाटत असतानाच आमच्या साऱ्यांच्या कष्टाचे चीज झाले आणि मी आयर्न मॅन झाले… असे सांगत असताना डॉ. स्मिता झांजुर्णे चेहऱ्यावर देशाचे नाव उज्ज्वल केल्याचा अभिमान झळकत होता.

हडपसर येथील डॉक्‍टर दाम्पत्यांनी सलग दोन वर्ष आयर्नमॅन पद पटकविले आहे. दुबईमध्ये झालेल्या या स्पर्धेत गेल्या वर्षी 2020 मध्ये डॉ. राहुल झांजुर्णे यांनी तर यावर्षी त्यांची पत्नी डॉ. स्मिता झांजुर्णे या “आयर्नमॅन’ (2021) ठरल्या आहेत. मागच्या वर्षी 2020 मध्ये दुबईला राहुल झांजुर्णे आयर्नमॅन झाले, त्यावेळी त्यांच्या पत्नी डॉ. स्मिता स्पर्धा पाहण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हाच त्यांनीही आयर्नमॅन 70.3 या स्पर्धेत उतरायचे ठरवून स्पर्धेची तयारी सुरू केली.

डॉ. स्मिता म्हणाल्या की, दुबईलाच पहिली आयर्नमॅन करायचा योग येईल, असे वाटले नव्हते. कठीण परिस्थितीतही ट्रेनिंग सुरू ठेवले. दररोज न चुकता पहाटे पाच वाजत पाण्यात बुडी मारणं आणि आल्यावर परत रनिंग आणि सायकलिंग या दिनक्रमात दिवस भुर्रकन उडून गेले.

स्पर्धेमध्ये मोठमोठ्या उसळत्या लाटा, समुद्राचं खारं पाणी आणि परत फिरल्यावर तापलेल्या सूर्याची डोळ्यात घुसणारी किरणं याच्यावर मात करून 58 मिनिटांत म्हणजेच बारा मिनिटे राखून स्विमिंग पूर्ण केले त्यानंतर ट्रान्सिशन झोन मध्ये उडी मारली. आयर्नमॅन मध्ये एक एक मिनिट महत्त्वाचा असतो. अशावेळी सायकलींगचे सामान ठेवलेली ट्रान्झिशन बॅग कुणीतरी उचलून नेली होती. ते शोधण्यात सहा मिनिटे गेली. त्यावेळी युरोप मधल्या दोन स्पर्धकांनी बॅग शोधण्यास मदत केली.

सायकलवर स्वार झाले. प्रचंड उलटे वारे आणि वाळवंटातील तापत्या उन्हात रनिंग लेग 90 किलोमीटरचे सायकलिंग संपवून रनिंगचे शूज घालीत 21 किलोमीटर रणरणत्या उन्हात धावायला सुरुवात केली. शेवटची काही किलोमीटर पती डॉ. राहुल यांनी खूप चेअरअप केले आणि मोठ्या वेगात फिनिश लाइन क्रॉस करीत स्पर्धा पूर्ण केली आणि मी आयर्न मॅन झाले.

आयर्न मॅन स्पर्धा कशी असते…
समुद्रातील स्विमिंग दोन किलोमीटर त्यानंतर 90 कि.मी. वाळवंटातील सायकलिंग त्यानंतर 21 कि.मी. रनिंग या स्पर्धेत जगभरातून 1700 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यामध्ये भारतातून 30 स्पर्धक सहभागी झाले होते तर डॉ. स्मिता झांजुर्णे या पुण्यातून एकमेव महिला स्पर्धक होत्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दिलेले अंतर साडेआठ तासांत पूर्ण करावे लागते ते दीड तास शिल्लक ठेऊन डॉ. स्मिता आयर्न मॅन ठरल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.