मावळात ५४३६.७९ हेक्‍टर क्षेत्र बाधित!

कृषी विभाग : राज्य शासनाकडे 11.91 कोटींच्या मदतीची अपेक्षा

कामशेत – यंदाच्या अवकाळी पावसाने मावळातील भातउत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. तालुक्‍यातील 15 हजार 647 हेक्‍टर क्षेत्रापैकी (उसाशिवाय) 13 हजार 419 हेक्‍टर क्षेत्रावर खरिपाचा पेरा झाला आहे. परतीच्या पावसामुळे भात, भुईमूग, फूलशेती, सोयाबीन पिकांसह 5436.79 हेक्‍टर क्षेत्राला फटका बसला आहे. हेक्‍टरी 20 हजार 400 रुपये नुकसानीची शिफारस कृषी, महसूल आणि गटविकास अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आली आहे, त्यानुसार 11 कोटी 91 लाख रुपये मदतीची प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी दिली.

अवकाळी पावसाचा तालुक्‍यातील 178 गावांना पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मावळातील सुमारे 5 हजार 436.79 हेक्‍टर क्षेत्रावरील पिकाला फटका बसला. भातपिकाला पवन, आंदर व नाणे मावळात इंद्रायणी, फुले समृद्धी या मुख्य वाणाबरोबरच पार्वती, सोनम, पवना तसेच काही स्थानिक वाणाला परतीचा तडाखा बसला आहे. यंदाचा समाधानकारक पावसामुळे तालुक्‍यातील भातपीक समाधानकारक होते. मात्र अखेरच्या टप्प्यात लांबलेल्या परतीच्या पावसामुळे बळीराजाच्या हाताशी आलेल्या भातपीक पाण्यात गेले आणि हाताशी आलेले पिकाचे मोठे नुकसान झाले.

मावळ तालुका हा भाताचे आगार असून, शेतकरी खरीप हंगामात भात पीक घेतात. भात पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या मावळात इंद्रायणी हे वाण प्रामुख्याने घेतले जाते. तसेच फुले समृद्धी, पवना यांचेही काही प्रमाणात पीक घेतले जाते. पीक चांगले यावे याकरिता यंदा शेतकऱ्यांनी भात लागवडीकरिता चार सूत्री तंत्रज्ञान वापरले होते. चारसूत्री शेती तंत्रज्ञान सोपे, शास्त्रीयदृष्ट्‌या कार्यक्षम आणि एकूण लागवडीचा म्हणजे बी-बियाणे, मजूर व खत यांचा खर्च कमी करणारे, वातावरणाचे प्रदूषण टाळणारे व भातशेती निश्‍चितपणे फायदेशीर करणारे ठरले आहे. एकीकडे खरिपाची पिकांचा समाधानकारक असतानाच परतीचा पाऊस लांबला आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पीक पाण्यात गेल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये घोर चिंता पाहवयास मिळाली.

मावळ तालुक्‍यातील पवन मावळ, नाणे मावळ आणि आंदर मावळ या प्रमुख तीन विभागात भात पिकाची लागवड ही टप्प्या-टप्प्याने होत असते. मावळात यंदा 12 हजार 664 हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. याशिवाय कृषी विभागाने चारसूत्री, कीड नियंत्रण राखण्यासाठी शेतीशाळेचा प्रयोग आता “हेल्दी’ आणि उत्तम वाढीसाठी यशस्वीचा मार्ग ठरेल, अशी समाधानकारक स्थिती असताना पावसाचा मुक्‍काम वाढल्याने ऐन काढणीच्यावेळी अवेळी कोसळणाऱ्या पावसामुळे होत्याचे नव्हते झाले.

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा घास हिरावला…
मावळात यंदा गतवर्षीच्या तुलनेत दीडपटहून अधिक पाऊस कोसळला. परतीच्या पावसामुळे तर पिकांची पुरती दाणादाण उडाली. भातपिकाबरोबरच अन्य कडधान्य पिकांची समाधानकारक वाढ झाली असतानाच परतीच्या पावसामुळे पिकांची नासाडी केली आणि शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक हिरावून घेतले आहे, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्‍त केली आहे.

मावळ तालुक्‍यातील महसूलची सात मंडळ आणि कृषी विभागाची तीन स्वतंत्र विभाग आहेत. या मंडलांतर्गत कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक यांनी मावळ तालुक्‍यात चार-पाच दिवस पाहणी करून पंचनामे केले. त्यानुसार तहसील कार्यालय, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांनी एकत्रितपणे पाहणी करीत 5,436.79 हेक्‍टर क्षेत्राला फटका बसल्याचे नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे हेक्‍टरी 20 हजार 400 रुपये नुकसान भरपाईसाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आली आहे, त्यानुसार मावळ तालुक्‍याला 11 कोटी 91 लाख रुपये मदतीची अपेक्षा आहे. शासकीय निर्णयानुसार मदत केली जाईल.
– देवेंद्र ढगे, तालुका कृषी अधिकारी, मावळ.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)