आंबेगावच्या आदिवासी भागात पिके भुईसपाट

मंचर  – कोंढवळ, निगडाळे, आहुपे, असाणे, माळीण, राजपूर, गोहे, पोखरी परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उभे भात पीक जमिनीवर आडवी पडली आहेत. आदिवासी शेतकऱ्यांचे मुख्य पीक असलेले भात पीक निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

आंबेगाव तालुक्‍याच्या पश्‍चिम आदिवासी भागात भात पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. उर्वरित क्षेत्रात नाचणी, वरई पीक घेतले जाते. काही ठिकाणी भात कापणी सुरू आहे तर काही ठिकाणी यासाठी अवकाश आहे. अवेळी पडणाऱ्या पावसाने भात शेतीचे नुकसान झाले आहे. नवरात्र उत्सवापासून भात पीक तयार होऊ लागले होते. शेतकरी पीक कापणीच्या तयारीत असतानाच पावसाने सुरुवात केल्याने कापणी खोळंबली आहे. पावसामुळे अनेक भागात उभे पीक आडवे पडून नुकसान झाले आहे.

वर्षभर प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडल्याने आधीच शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. उर्वरित भात पिकामधून काही तरी हातात लागेल या अपेक्षेने शेतकरी असतानाच पुन्हा पावसाने नुकसान केले आहे. शासनाने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वामन सखाराम लोहकरे, गेणू कावजी लोहकरे, आशाबाई लोहकरे, मारुती काळू डामसे, शांताराम बाबू डामसे, गोविंद गोमा वाजे यांनी केली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.