कांदा भिजल्यामुळे शेतकरी संकटात : ज्वारी, मका पिके वाऱ्याने जमीनदोस्त
आंबेगावात पावसामुळे पिकांचे नुकसान
अवसरी – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात झालेल्या पावसामुळे शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसामुळे काही भागात 18 तास वीज गायब होती.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पारगाव, शिंगवे, वळती, रांजनी, कारफाटा, थोरांदलें, चांडोली बुद्रुक, चांडोली खुर्द, निरगुडसर, अवसरी बुद्रुक, अवसरी खुर्द, मंचर या भागात शनिवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक घरांचे व गोठ्यांच शेड उडून गेले. चांडोली बुद्रुक येथील मंचर थोरांदले रस्त्यावरील बाभळ आणि इतर झाडांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या. वादळी वाऱ्याबरोबर झालेल्या पावसामुळे काढणी योग्य उन्हाळी बाजरीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. जनावरांसाठी असलेली ज्वारी, मका हे पिके वाऱ्याने पडून जमीनदोस्त झाली आहेत. शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला कांदा भिजल्यामुळे मोठ्या नुकसान झाले आहे.