माफी मागण्याचे नेटकऱ्यांनी केले आवाहन
नवी दिल्ली – देशातील एका समाजातील खेळाडू असलेल्या यजुवेंद्र चहल याच्यावर जातिवाचक टीका केल्याप्रकरणी युवराजसिंग सध्या टीकेचा धनी बनला आहे. सोशल मीडियावरील एका चॅट-शोमध्ये बोलताना युवराजने चहलवर जातिवाचक टीका केली होती, त्यावरून नेटकऱ्यांनी त्याची चांगलीच खरडपट्टी काढली व चहलची जाहीर माफी माग अशी मागणीही केली आहे.
करोनामुळे सध्या सर्व खेळाडू आपापल्या घरातच असल्याने त्यांचा सोशल मीडियावरील वावर वाढला आहे. त्यातच अनेक चर्चात्मक कार्यक्रमातही हे खेळाडू ऑनलाइन सहभाग घेत आहेत. अशाच एका ऑनलाइन चर्चेत भारताचा माजी कसोटीपटू व आक्रमक फलंदाज युवराज सिंग उपकर्णधार रोहित शर्मा याच्याशी संवाद साधत होता. त्यावेळी अनेक किस्से युवराजने सांगितले. याचदरम्यान त्याने चहलबाबत एक टीका केली. चहल एका समाजाचे प्रतिनिधित्व करतो त्यामुळे युवराजची टीका सोशल मीडियावर व्हायरल झाली. युवराजसारखा जबाबदार खेळाडू असे बोलतो हे पाहून नेटकरी संतापले व त्यांनी त्याला ट्रोल करताना चहलची माफी माग, असेही सुनावले.
चहल, रोहित व युवराज ज्यावेळी एकत्र एकाच संघात होते तेव्हाच्या काही आठवणींना उजाळा देताना युवराजला गंमत सुचली व त्याने चहलच्या बाबतीत जातिवाचक टीका केली. मात्र, या मस्करीची कुस्करी झाली आणि आता युवराजच टीकेचा धनी बनला आहे. तसेच काही खेळाडूंच्या वर्तनावरही टीका करत आहेत. प्रशिक्षक, निवड समिती किंवा क्रिकेट संघटनेतील पदाधिकारी यांनाही ते लक्ष्य करत आहेत. मात्र, एखाद्यावर टीका करताना भान असावे व आपल्याकडे पाहून नवोदित काय प्रेरणा घेणार याचाही विचार केला पाहिजे, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी युवराजला सुनावले असून चहलची जाहीर माफी माग, असेही सांगितले आहे.