मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, उद्योगपती गौतम अदानी यांच्या प्रमुख उपस्थितीत बारामती येथे विज्ञान आणि नावीन्यता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रोहित पवार यांनी अदानींची गाडी चालवली त्यावरून आता त्यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत असल्याचे दिसत आहे.
गौतम अदानी यांचे स्वागत करण्यासाठी रोहित पवार स्वत: बारामती विमानतळावर उपस्थित होते. गौतम अदानी विमानतळावर उतरल्यानंतर रोहित पवार यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर रोहित पवार यांनी गौतम अदानी यांची गाडी स्वत: चालवत त्यांना विज्ञान केंद्रापर्यंत नेले. यानंतर रोहित पवारांचे गाडी चालवतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला आहे. “अदानी आणि अंबानींवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला लक्ष्य करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बगलबच्च्यांना आमदार रोहित पवार यांनी आपल्या कृतीनेच उत्तर दिले आहे,” असा टोला अतुल भातखळकरांनी लगावला आहे. “अदानी इतके मोठे आहेत की पवार त्यांच्यासाठी ड्रायव्हर सुद्धा बनू शकतात. किती हा नम्रपणा,” अशी उपहासात्मक टिप्पणीही त्यांनी केली आहे.
या कार्यक्रमाला राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक सावंत, डॉ. सी. डी. माई, रयत शिक्षण संस्थेचे डॉ. अनिल पाटील, होमी भाभा विज्ञान आणि संशोधन केंद्राचे डॉ. अर्णव भट्टाचार्य, नेहरू विज्ञान केंद्राचे डॉ. सुब्रत चौधरी, तरुण वैज्ञानिक गोपाली जी., ‘अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट’चे चेअरमन राजेंद्र पवार, प्रीती अदानी आदी उपस्थित होते.