मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली गेल्या दोन दिवसांपासून टीकेचा धनी होत आहे. दिवाळीचा सण आनंदाने साजरा करा पण फटाके उडवू नका, असा संदेश दिल्याने सध्या कोहलीवर प्रचंड टीका होत आहे.
काही वर्षांपूर्वी खुद्द कोहलीच फटाके फोडत असल्याचा फोटो नेटकऱ्यांनी त्याच्या ट्विटरवर पोस्ट करत कोहलीवर टीका केली आहे. दिवाळीसाठी असे संदेश देण्यापेक्षा सध्या सुरू असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेतील कामगिरीकडे लक्ष दे, अशा शेलक्या शब्दांत कोहलीला लक्ष्य केले जात आहे.
कोहलीच फटाके फोडत असल्याचे फोटो पोस्ट करतानाच नेटकऱ्यांनी ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण’ अशी टॅगलाईन देत कोहलीची खिल्ली उडवली आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देताना फटाके फोडू नयेत असले उपदेश करू नकोस, विश्वकरंडक स्पर्धेतील तुझ्या कामगिरीकडे लक्ष दे, अशा शब्दांतही अनेकांनी टीका केली आहे.
काही युजर्सनी तर त्याचे जुने फोटो व्हायरल केले आहेत. एका फोटोत कोहली स्वतः फटाके फोडताना दिसत आहे. त्यामुळे भूतकाळात काय केले त्याचा विचार कर आणी सध्या केवळ खेळावर लक्ष केंद्रित कर, असा टोलाही कोहलीला मारण्यात आला आहे.