औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजच्या औरंगाबादमधील सभेसाठी शिवसेनेने जय्यत तयारी केली आहे. या सभेमध्ये उद्धव ठाकरे कोणावर बाण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना दुसरीकडे भाजपकडून सभेवर टीका करण्यात येत आहे. यासर्व घडामोडीमध्ये औरंगाबादमधील शिवसेना नगरसेवकाने केलेली जाहिरातबाजी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. “आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही” अस म्हणत नगरसेवकाने भाजपावर सडकून टीका केली आहे.
शिवसेनेचे माजी नगरसेवक चेतन कांबळे यांनी ही जाहिरात दिली आहे. मुख्यमंत्र्याच्या सभेआगोदर औरंगाबादमध्ये ही जाहिरात चांगलीच चर्चेत आली आहे. “ईडी, आर्थिक कोंडी आणि बदनामी करुन उद्धव ठाकरे सरकारला घेरलं तर गाठ शिवशक्ती-भीमशक्तिशी आहे,” असा इशारा चेतन कांबळे यांनी जाहिरातीतून दिला आहे.
उद्धव ठाकरेंवर प्रतिगाम्यांचा राग का? अशी विचारणा करताना चेतन कांबळे यांनी आमचे हिंदुत्व बहुजनांचे आहे. दीड टक्क्यांचे नाही, शेंडी-जानव्याचे नाही असंही म्हटलं आहे.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी करोना परिस्थिती प्रभावीपणे हाताळली याची दखल जागतिक पातळीवर अमेरिकन, युरोपियन संस्था, मीडियाने घेतली. उत्तर प्रदेशप्रमाणे गंगाकिनारी लाखो प्रेतं बेवारस दफन केले नाहीत. थाळ्या, टाळ्या वाजवून नाकर्तेपणा केला नाही,” असा टोला चेतन कांबळे यांनी लागवला आहे.