Manipur Violence | मणिपूरमध्ये सातत्याने हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. गेल्या आठवड्यात पुन्हा येथे हिंसाचार उफाळून आला आहे. सरकार राज्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकलेले नाही. राज्याच्या विविध भागांत गेल्या तीन दिवसांत झालेल्या हिंसाचारात 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विद्यार्थ्यांनी मंगळवारी राजभवनाकडे मोर्चा काढला. विद्यार्थी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत 50 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. पाच दिवसांपासून राज्यभरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तीन जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
तर राज्यातील सरकारी आणि खासगी महाविद्यालये 11 आणि 12 सप्टेंबर रोजी बंद ठेवण्याचे आदेश उच्च शिक्षण विभागाने दिले आहेत. मणिपूर राज्यात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तर मंगळवारी इंफाळ पश्चिम आणि इंफाळ पूर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दोन्ही जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू केला.
आंदोलकांकडून राजभवनाकडे कूच करण्याचा प्रयत्न
मणिपूरमध्ये ड्रोन आणि रॉकेट हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, त्यामुळे राज्य पोलिसांनी या भागात ड्रोनविरोधी यंत्रणा तैनात केली आहे. गेल्या आठवड्यात मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात पुन्हा हिंसाचार उसळला. मंगळवारी आंदोलकांनी राजभवनाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला.
विद्यार्थी आणि महिला आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षात सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. डीजीपी आणि मणिपूर सरकारच्या सुरक्षा सल्लागारांना हटवण्याच्या मागणीवर आंदोलक ठाम आहेत. खवैरामबंद महिला बाजारामध्ये छेडछाड होत असल्या कारणाने शेकडो विद्यार्थिनींनी बीटी रोड मार्गे राजभवनाकडे मोर्चा वळवण्याचा प्रयत्न केला. परंतु सुरक्षा दलांनी त्यांना काँग्रेस भवनाजवळ रोखले.
दरम्यान, कांगपोकपी जिल्ह्यात दोन सशस्त्र गटांमध्ये रविवारी झालेल्या संघर्षात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मंगळवारी पोलिसांनी दिली. तर दुसरीकडे सुरक्षा कर्तव्यासाठी सुमारे 2,000 जवानांचा समावेश असलेल्या दोन नवीन CRPF बटालियन तैनात करण्याचे निर्देश केंद्राने दिले आहेत.